सूरत : गुजरातचे माजी मंत्री कांतिभाई गामित यांना अटक करण्यात आली आहे. कोरोना संबंधित गाईडलाईन्सचं पालन न केल्यानं त्यांच्यासह त्यांचे पुत्र आणि 16 लोकांना अटक केली आहे. माहितीनुसार गामित यांच्या नातीच्या साखरपुड्याचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला दोन हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. या समारंभाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गामित यांच्यासह 18 जणांना अटक केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार अटक केलेल्या लोकांमध्ये एक पोलिस इंस्पेक्टर देखील आहे. या पोलिस अधिकाऱ्याला कर्तव्य पालन करण्यात कचुराई केल्याबद्दल अटक करण्याआधी निलंबित करण्यात आलं आहे.

सूरत-तापी रेंजचे पोलिस महानिरीक्षक एस पांडिया राजकुमार यांनी सांगितलं की, तापी जिल्ह्यातील सोनगड तालुक्यामधील दोसवाडा गावात 30 नोव्हेंबर रोजी हा समारोह झाला होता. या संदर्भात एक प्राथमिक तक्रार दाखल करण्यात आली होती.

राजकुमार यांनी सांगितलं की, माजी भाजप आमदार गामित, त्यांचे पुत्र जितेंद्र गामित आणि 16 अन्य लोकांना कोरोना महामारीदरम्यान मोठा कार्यक्रम आयोजित करणे आणि अनेक लोकांच्या जीवाला धोक्यात टाकण्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.

त्यांनी सांगितलं की, या व्हिडीओमध्ये 2000 पेक्षा अधिक लोक सोशल डिस्टन्सिंग न ठेवता आणि मास्क न लावता कार्यक्रमात सहभागी झाल्याचे दिसत आहे. कोरोना गाईडलाईन्सचं पालन न केल्यानं तापी पोलिसांनी गामित यांच्यासह त्यांचे पुत्र आणि अन्य 16 लोकांना अटक केली आहे.