नवी दिल्ली : दिल्लीमध्ये राज्यांची जी सदनं आहेत, त्यात सर्वात देखणी आणि आकर्षक इमारत म्हणून महाराष्ट्र सदनाचा उल्लेख होत असताना, या स्पर्धेत आता गुजरातनेही उडी घेतली आहे. दिल्लीतल्या अकबर रोडवर अवघ्या दीड वर्षात गुजरात भवनची आकर्षक वास्तू उभारण्यात आली आहे. 2 सप्टेंबरला, गणेशोत्सवाच्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी या इमारतीचं उद्घाटन करणार आहेत.
132 कोटी रुपये खर्चून ही इमारत एनबीसीसी या कंपनीने बांधली आहे. विशेष म्हणजे दिल्लीत ज्या ठिकाणी काँग्रेसचं मुख्यालय आहे, त्याच्या अगदी समोरच मोदी-शाहांच्या या गुजरात भवनची वास्तू उभी करण्यात आहे. एकूण 20 हजार 325 चौरस मीटर अंतरावर हे सहा मजली सदन उभारण्यात आलं आहे.
महाराष्ट्र सदनाप्रमाणेच याही इमारतीला ऐतिहासिक लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 'गर्वी गुजरात भवन' असं या नव्या सदनाचं नामकरण होणार आहे. गुजरातच्या मुख्यमंत्री आणि राज्यपालांसाठी स्वतंत्र आलिशान कक्ष, मंत्र्यांसाठीचे 19 आलिशान कक्ष असं मिळून यात दीडशेपेक्षा अधिक निवासी कक्ष आहेत. दोन अंडरग्राऊंड पार्किंग्जही या इमारतीच्या खालच्या भागात असणार आहेत. शिवाय आधुनिक सेवांनी युक्त असे मल्टीपर्पज हॉल, मीडिया रुम, टेरेस गार्डन पब्लिक डायनिंग हॉल यात उभारण्यात आले आहेत.
दिल्लीत उत्तम चवीसाठी ओळखलं जाणारं जुन्या गुजरात सदनातील कॅन्टीन आता या नव्या सदनात स्थलांतरित होणार असंही समजतं आहे. इंडिया गेटच्या अगदी जवळच ही नवी इमारत असल्याने उत्कृष्ट शाकाहारी जेवणासाठी अनेक खवय्यांची पावलं इकडे वळणार यात शंका नाही.
दिल्लीत महाराष्ट्र सदनाच्या धर्तीवर उभं राहिलं नवं गुजरात सदन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Aug 2019 12:44 PM (IST)
महाराष्ट्र सदनाप्रमाणेच याही इमारतीला ऐतिहासिक लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 'गर्वी गुजरात भवन' असं या नव्या सदनाचं नामकरण होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -