Gujarat Results 2022 : गुजरात विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल (Gujarat Assembly Elections Results) आज जाहीर होणार आहेत. या निकालाकडं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. गुजरातमध्ये भाजप (BJP) सत्ता राखणार की, काँग्रेस (Congress) आणि आम आदमी पक्ष (Aam Aadmi Party) तिथे चमत्कार करणार हे पाहणं महत्त्वाचं ठारणार आहे. मात्र, निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वीच काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी (jignesh mevani) यांनी मोठा दावा केला आहे. गुजरातमध्ये सर्व एक्झिट पोल चुकीचे ठरतील आणि काँग्रेस सत्ता स्थापन करेल असा मोठा दावा मेवाणी यांनी केला आहे. गुजरातमध्ये काँग्रेसला 120 जागा मिळतील, असा दावाही मेवाणी यांनी केला आहे.


ही विधानसभा निवडणूक देशाला नवी दिशा देईल


गुजरात राज्यात गेल्या 27 वर्षांपासून भाजपचे सरकार आहे. यावेळीही एक्झीट पोलनुसार गुजरातमध्ये भाजप सरकार स्थापन करण्याची शक्यता आहे. जवळपास सर्वच एक्झिट पोलमध्ये भाजपला पुन्हा बहुमत मिळण्याचा अंदाज आहे. मात्र, निकाल लागल्यावर सर्व एक्झिट पोल फेल होतील, असा दावा काँग्रेस आमदार जिग्नेश मेवाणी यांनी यांनी केला आहे. ही विधानसभा निवडणूक गुजरात आणि देशाला नवी दिशा देईल असे मेवाणी यांनी म्हटलं आहे. राज्यात बदल होणे अत्यंत गरजेचे असल्याचं मेवाणी यांनी  म्हटलं आहे. ही निवडणूक स्वैराचार, बेरोजगारी आणि महागाईच्या विरोधात असल्याचं मेवाणी यांनी म्हटलं आहे. यावेळी काँग्रेसला गुजरातमध्ये 120 जागा मिळतील असे ते म्हणाले.


मागील निवडणुकीपेक्षा समीकरणे वेगळी 


मागील निवडणुकीत जिग्नेश मेवाणी, हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर हे तीन नेते एकत्र होते. या तिन्ही नेत्यांनी  भाजपला 99 जागांवर रोखले होते. मात्र, यावेळी समीकरणं वेगळी आहेत. यावेळी हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकूर हे स्वतः भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत.