अहमदाबाद: एका दाम्पत्यानं पैशांच्या लालसेनं दत्तक घेतलेल्या मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना गुजरातमधील जुनागढमध्ये उघडकीस आली आहे. या एनआरआय जोडप्याविरोधात मुलाच्या हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या जोडप्यानं 2015 साली मुलाला दत्तक घेतलं होतं.

1 कोटी 20 लाख रुपये विम्याच्या पैशांसाठी मुलाचा खून

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, '1 कोटी 20 लाख रुपये विम्याच्या पैशांसाठी या जोडप्यानं मुलाच्या हत्येचा कट रचला. आरती लोकनाथ आणि तिचा पती कंवलजीत सिंह रायजादा या जोडप्यानं  2015 साली  13 वर्षीय गोपालला दत्तक घेतलं होतं.  हे दोघंही सध्या लंडनमध्ये आहेत.

...म्हणून त्यांनी मुलाचा वीमा काढला

पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरती आणि कंवलजीतनं नीतीश मुंदच्या साथीनं 13 वर्षीय गोपालला दत्तक घेतलं. त्यानंतर त्यांनी मुलाचा वीमा काढला. पण झटपट विम्याचे पैसे मिळावे यासाठी त्यांनी मुलगा गोपालची हत्या केली.

याप्रकरणी काल आरोपी नीतीशला अटक करण्यात आली. त्यानंतर आरती आणि कंवलजीतच्या यातील सहभाग उघड झाला. गोपालचा काल राजकोटमधील रुग्णालयात मृत्यू झाला. दरम्यान, आठ फेब्रुवारीला रात्री जुनागढमध्ये दोन अज्ञात मोटरसायकल चालकांनी गोपालवर चाकूनं हल्ला केला होता.

गोपाल हा नीतीशसोबत राजकोटहून परतत असताना त्याच्यावर हा हल्ला झाला. आरती आणि तिचा पती कवलजीत हे सध्या लंडनमध्ये आहेत. सध्या पोलीस याप्रकरणी इतर लोकांची चौकशी करीत आहेत.