Gujarat Drugs Case : गुजरात एटीएसने मोरबी जिल्ह्यातील जांजुरा गावामध्ये तब्बल 120 किलो हेरॉईन जप्त केलं आहे. याची अंदाजे किंमत सहाशे कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे. ड्रग्जच्या तस्करी प्रकरणी गुजरात एटीएसनं दोन जणांना अटक केली आहे. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास गुजरात एटीएसची पत्रकार परिषद होणार आहे. यामध्ये याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे. राज्याचे मंत्री हर्ष सांगवी यांनी याबाबतची माहिती ट्वीट करत दिली आहे.  गेल्या आठवड्यात गुजरातमध्ये साडेतीनशे कोटी रुपयांचं ड्रग्ज पकडण्यात आलं होतं. महिनाभर आधी तब्बल  9 हजार कोटी रुपयांचं हेरॉईन जप्त करण्यात आलं होतं. त्यामुळे महाराष्ट्रानंतर गुजरातध्येही ड्रग्जचं प्रकरण तापण्याची शक्यता आहे.






मुंद्रा पोर्टवरुन 9 हजार कोटींचं ड्रग्ज जप्त -
अदानी समूहाकडे मालकी असलेल्या गुजरातमधील कच्छ येथील मुंद्रा पोर्टवरुन तीन हजार किलोचे ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं. याची किंमत अंदाजे 9 हजार कोटी रुपयांचं असल्याचं सांगण्यात येत आहे. अफगाणिस्तानमधून या ड्रग्जची तस्करी झाल्याचं समजतेय. याप्रकरणी देशभरात छापेमारी करण्यात आली. दिल्ली, चेन्नई, अहमदाबाद, गांधीधाम, मांडवी येथे एटीएसमार्फत छापेमारी करण्यात आली होती.  


अनेक दिवसांपासून सर्च ऑपरेशन – 
गुजरातमध्ये गेल्या काही दिवसांपासून ड्रग्ज पकडण्यासाठी सर्च ऑपरेशन करण्यात येत आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधून ड्रग्जची तस्करी होत असल्याचं समजतेय. पोलिसांकडून सापळा रचून कारवाई केली जात आहे. मुंबईनंतर गुजरातमध्ये ड्रग्जची तस्करी मोठ्या प्रमाणात होतेय.