Hardik Patel Resign : गुजरातमध्ये (Gujrat) काँग्रेसला मोठा धक्का बसला असून हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी काँग्रेसला (Congress) रामराम केला आहे. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या आधी काँग्रेसला मोठा धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तसेच, गेल्या बराच काळापासून हार्दिक पटेल यांची नाराजी असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरु होत्या. 


हार्दिक पटेल यांच्या राजीनाम्यामुळे गुजरात काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. आगामी गुजरात विधानसभा निवडणुकांपूर्वीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. गुजरात काँग्रेसचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी बुधवारी राजीनामा दिला. यासंदर्भातील ट्वीटमध्ये पटेल म्हणाले की, "आज मी धैर्यानं काँग्रेस पक्षाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की, माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मला विश्वास आहे की, माझ्या या पावलानंतर मी भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन." 



राजस्थानमधील उदयपूरमध्ये काही दिवसांपूर्वी काँग्रेसकडून चिंतन शिबिर पार पडलं. त्या चिंतन शिबिरानंतर हार्दिक पटेल पक्षाला रामराम ठोकणारे दुसरे नेते आहेत. काही दिवसांपूर्वी हार्दिक पटेलनं राहुल गांधी यांची भेट घेतली होती. पाटीदार आरक्षण आंदोलनाचा चेहरा म्हणून ते देशासमोर आले होते. त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. तेव्हापासूनच गुजरात काँग्रेसमधील महत्त्वाच्या चेहऱ्यांपैकी एक म्हणून हार्दिक पटेलची ओळख होती. पण गेल्या काही दिवसांपासून हार्दिक पटेल यांनी पक्षश्रेष्ठींबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. तसेच, काँग्रेस नेतृत्त्वावरुन काही प्रश्नही उपस्थित केले होते. 


एकीकडे काँग्रेस नेतृत्त्वावर प्रश्न उपस्थित करणारे गुजरात काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल, दुसरीकडे मात्र भाजपवर कौतुकाचा वर्षाव करत होते. तेव्हापासूनच हार्दिक पटेल काँग्रेसला रामराम करुन भाजपची कास धरणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. तसेच, काही दिवसांपूर्वी भाजप नेत्यांच्या भेटीगाठींमुळेही ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा जोर धरत आहेत.