Gujarat Accident News: आज 2022 या वर्षाचा अखेरचा दिवस आहे. उद्यापासून नव्या वर्षाला सुरुवात होत आहे. 2022 वर्षाच्या अखेरच्या दिवशी गुजरातमध्ये भीषण अपघात झालाय. कार आणि लग्जरी बसमध्ये झालेल्या या अपघातामध्ये 9 जणांचा मृत्यू झालाय. तर 28 जण जखमी झाले आहे. अपघातानंतर चालकाला हार्टअटॅक आला होता, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. 


शनिवारी सकाळी गुजरातमधील नवसारी (Navsari) येथे राष्ट्रीय राज्य महामार्ग 48 वर कार आणि लग्जरी बसमध्ये भीषण अपघात (Accident) झाला. या दुर्देवी घटनेनंतर नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर 28 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक तात्काळ घटनास्थळावर दाखल झाले. अपघातात जखमी झालेल्यांवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 






चालकाला हार्टअटॅक
नवसारी जिल्हा पोलीस अधिकाऱ्यानं या घटनेची माहिती दिली. या दुर्देवी अपघातामध्ये नऊ जणांचा मृत्यू झालाय. अपघातामधील 11 जखमींना नवसारीमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर 17 जणांवर वलसाड (Valsad) येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या एका व्यक्तीला सूरत येथील (Surat) सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. दुर्घटनास्थळी असलेल्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, अपघातानंतर चालकाला हार्टअटॅक आला होता, त्यामुळे उपरासाठी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.


वलसाडच्या दिशेनं जात होती गाडी - 
प्राथमिक माहितीनुसार, लग्जरी बस अहमदाबाद शताब्दी महोत्सवातील लोकांना घेऊन वलसाडला जात होती. त्याचवेळी रेश्मागावाजवळ एका फॉर्च्यूनर कारला धडकली. या अपघातानंतर राज्य महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहनांना क्रेनच्या मदतीनं रस्त्याच्या बाजूला केलं. त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केलं दु:ख
लग्जरी बस आणि कारच्या भीषण अपघातानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलेय. पंतप्रधानांनी ट्वीट करत मृताच्या कुटुंबियांना धीर दिलाय. त्याशिवाय गृहमंत्री अमित शाह यांनीही अपघाताबद्दल ट्वीट करत खेद व्यक्त केलाय. पीएम केअर फंडातून मृताच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची तर दुखापतग्रस्तांना 50 हजार रुपयांच्या मदतीची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.