Raghuram Rajan: भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गर्व्हनर रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) सहभाग नोंदवल्यानंतर राजन राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा सुरू झाली होती. रघुराम राजन हे काँग्रेसच्या (Congress) माध्यमातून राजकारणात प्रवेश करतील अशी चर्चा सुरू होती. मात्र, आता या चर्चेला राजन यांनी पूर्णविराम लावला आहे. राजन यांनी राजकारणातील प्रवेशाचे वृत्त फेटाळून लावताना 'भारत जोडो' यात्रेत का सहभागी झाले याचे उत्तर दिले. 


रघुराम राजन हे राजस्थानमधील सवाई माधोपूरमध्ये भारत जोडो यात्रेत सहभागी झाले होते. त्या दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजन यांच्या मुलाखतीचा व्हिडिओदेखील समोर आला. या मुलाखतीत राजन यांनी अर्थव्यवस्थेच्या अनेक पैलूंवर चर्चा केली होती. रघुराम राजन यांनी 'ईटी नाऊ'सोबत बोलताना सांगितले की, भारताचा नागरीक असल्यामुळे या भारत जोडो यात्रेत सहभागी व्हावे असे वाटल्याने यात्रेत सहभागी झालो. देशाचा नागरीक म्हणून देशातील मुद्यांची माहिती असून जबाबदारीचे भान आहे. त्यामुळे या यात्रेत निव्वळ सहभाग दाखवला असल्याचे त्यांनी सांगितले. या यात्रेचा राजकीय संबंध लावता कामा नये असेही त्यांनी स्पष्ट केले. 


रघुराम राजन यांनी सांगितले की, राजकारणात प्रवेश करण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. राजकारणात प्रवेश करणार नसून भारत जोडो यात्रेनंतर सुरू असलेली चर्चा वायफळ असल्याचे त्यांनी सांगितले. 


रघुराम राजन यांची राहुल गांधी यांनी मुलाखत घेतली होती. त्यावेळी आगामी वर्षात अर्थव्यवस्था कशी असेल यावर त्यांनी अंदाज वर्तवला होता. पुढील वर्षी जगाचा आर्थिक विकासाचा दर घटणार असल्याचा अंदाज राजन यांनी व्यक्त केला होता. व्याज दरात सातत्याने वाढ केली जात असून त्याचा परिणाम भारतावर होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. भारतात व्याज दर वाढला आहे. पण भारताची निर्यात सातत्याने घटली असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. भारतातील महागाई ही कमोडिटीच्या दरात सुरू असलेल्या उसळणीमुळे असल्याचे त्यांनी म्हटले. 


कोरोना काळात निम्न-मध्यमवर्ग आणि गरिबांचे मोठे नुकसान झाले. या वर्गाला पुन्हा एकदा उभारी देण्यासाठी सरकारने धोरण आखण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. निम्न मध्यमवर्ग आणि गरीब वर्गातून श्रमिक, कष्टकरी वर्गाचा समावेश होतो, याकडे त्यांनी लक्ष वेधले.