सुरत : गुजरातच्या सुरत शहरात अतिशय भीषण अपघात झाला आहे. सुरतच्या पिपलोद गावात फूटपाथवर झोपलेल्या 18 जणांना एका ट्रकने चिरडलं. यामध्ये अपघातात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी 14 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एका मजुराचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित लोकांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मृतांमध्ये एका लहान मुलीचा समावेश आहे.





गुजरातच्या सुरतमधील किम रोडच्या फूटपाथवर सोमवारी (18 जानेवारी) रात्री 18 जण झोपले होते. रात्री उशिरा ऊसाने भरलेला ट्रक अतिशय वेगाने आला. चालकाचं ट्रकवरील सुटलं आणि त्याने फूटपाथवर झोपलेल्या लोकांना चिरडलं.


पोलिसांच्या माहितीनुसार, "अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्व जण मजूर होते. हे मजूर राजस्थानच्या बांसवाडा जिल्ह्यातील कुशलगडचे रहिवासी होते." सध्या पोलिसांनी या प्रकरणी तपास करत आहेत.