नोएडा : स्वतःच्याच लग्नाच्या वरातीत नाचण्याचा उत्साह उत्तर प्रदेशातील नवरदेवाच्या चांगलाच अंगलट आला. वरात नाचत असलेला पूल कोसळल्यामुळे नवरदेवासह 15 जण गटारात पडले. यामध्ये दोघे चिमुरडे जखमी झाले आहेत.

नोएडा सेक्टर 52 मधील होशियारपूर गावातील 35 वर्षीय अमिच यादवचं शनिवारी लग्न होतं. यावेळी ऑलिव्ह गार्डन वेडिंग बँक्वे हॉलचा गेट आणि लॉन यांना जोडणाऱ्या पूलावर वरात नाचत आली. नवरदेवासह 15 जण या पुलावर जीव तोडून नाचत होते.

पूलाच्या दुसऱ्या बाजूला वधूपक्ष नवरदेवाचं औक्षण करण्यासाठी थांबला होता. जवळपास दहा मिनिटं झाली, तरी वरातीचा डान्स थांबण्याचं नाव घेत नव्हता. तेवढ्यात पूल कोसळला आणि सर्व जण त्याखाली असलेल्या गटारात पडले.

या प्रकारानंतर विवाहस्थळी एकच गोंधळ उडाला होता. अखेर बँक्वे हॉलच्या मालकाने तीन लाखांची रोकड वधूपित्याला दिल्यानंतर प्रकरण थंडावलं. गेल्या 15 वर्षांत आधी कधीच अशी परिस्थिती ओढावली नव्हती, मात्र आम्ही दिलगिर आहोत, असं सांगत त्यांनी वधूपक्षाने भरलेली पै न् पै परत केली.

वरातीत नाचणाऱ्या अनेक जणांचे मोबाईल आणि दागिन्यांसारख्या मौल्यवान वस्तू गटारात पडल्याचा दावा नवरदेवाच्या भावाने केला आहे. या अपघातामध्ये आठ वर्षांखालील दोघे चिमुरडे जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, मात्र कोणतीही तक्रार नोंदवण्यात आलेली नाही.