नवी दिल्ली : सध्या दिल्लीच्या रस्त्यावर ‘ग्रीन गड्डी’ची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. पर्यावरणाबद्दल जागृती करण्यासाठी चक्क गाडीच्या टपावर झाडं लावण्याची अफाट कल्पना सगळ्यांनाच चकीत करत आहे.

दिल्लीतल्या गौरव आहुजा आणि खुशबू रस्तोगी या दोन तरुणांनी ही कल्पना प्रत्यक्षात आणली असून, दिल्लीच्या प्रदूषणाचा स्तर भयानक पातळीवर पोहचलेला असताना त्याबद्दल या दोघांनी हा उपक्रम सुरु केला.

वास्तविक, देशात सर्वाधिक गाड्यांची संख्या दिल्लीत आहे. त्यामुळे दिल्लीतील वाढत्या प्रदूषणासाठी सर्वाधिक गाड्या हेही एक कारण असल्याचं बोललं जात आहे.

गेल्या वर्षी दिल्लीतील मोठ्या ट्रॅफिक जाममध्ये अडकलेले असताना, दोघांना ही कल्पना सुचली. त्यानंतर त्यांनी यावर काम करण्यास सुरुवात केली. गाडीवर झाडं लावण्याचं कुठलं मॉडेल अस्तित्त्वात नसल्यानं त्यांना हे टिकवायचं कसं? यावर बरीच मेहनत घेतली.

मागच्या आठ महिन्यांपासून त्यांची ही गाडी दिल्लीच्या रस्त्यावर प्रदूषणमुक्त दिल्लीचा संदेश देत फिरत आहे. विशेष म्हणजे, स्वत: अस्थमाची पेशंट असलेली खुशबू पर्यावरणाच्या रक्षणासाठी धडपडत  आहे.

‘आय एम द सोल्यूशन’ या नावानं हे दोघे त्यांची मोहीम अधिक लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करत आहेत.