Mahakal Lok Corridor Ujjain : मध्य प्रदेशच्या उजैनमध्ये भव्य महाकाल कॉरिडॉर तयार झाला आहे. महाकाल कॉरिडॉरला महाकाल लोक असंही म्हणतात. पंतप्रधानांच्या हस्ते या भव्य कॉरिडॉरचं उदघाटन करण्यात येणार आहे. 11 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाकाल लोक भव्य मंदिराचं लोकार्पण करण्यात येणार आहे. महाकालेश्वर मंदिर कॉरिडॉर विकास योजनेच्या पहिल्या टप्प्याचं उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते पार पडणार आहे. या प्रकल्पासाठी 856 कोटींचा खर्च आला आहे. महाकाल लोक वास्तूकला आणि स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आज कॉरिडॉर लोकर्पण सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतील.


असं आहे महाकाल लोक


महाकाल कॉरिडॉरमध्ये दोन भव्य प्रवेशद्वार आहेत. याशिवाय सुंदर वास्तूकला आणि नक्षीकाम असलेले 108 स्तंभ आहेत. शिवपुराणातील माहिती सांगणारे देखावे आणि मुर्ती, 50 हून अधिक भित्तीचित्रे आणि कारंजे अशा या कॉरिडॉरची वैशिष्ट्य आहेत. महाकाल लोक 900 मीटरहून अधिक लांब कॉरिडॉर आहे. हा भारतातील सर्वात मोठं कॉरिडॉर आहे. महाकाल कॉरिडॉरमध्ये दोन प्रवेशद्वार आहेत. यातील एक म्हणजे नंदी द्वार आणि दुसरं पिनाकी द्वार. हा महाकाल कॉरिडॉर भाविकांना नंदी द्वारपासून महाकालेश्वर मंदिरापर्यंत घेऊन जातो.


उज्जैनमधील प्राचीन महाकालेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्याच्या उद्देशानं हे महाकाल लोक उभारण्यात आलं आहे. उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. देश-विदेशातील अनेक भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात. या कॉरिडॉरसाठी 856 कोटी निधी लागला आहे. या कॉरिडॉरमुळे मध्यप्रदेशातील पर्यटनालाही चालना मिळणार आहे. मंगळवारी पहिल्या टप्प्याचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यासाठी सुमारे 350 कोटी खर्च आला आहे.






पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते लोकार्पण


महाकाल कॉरिडोरचे बांधकाम 2019 मध्ये सुरू झाले होते. हा संपूर्ण मंदिर परिसर दोन हेक्टरमध्ये असून त्यासाठी सुमारे 800 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. बांधकामाच्या एकूण खर्चापैकी 422 कोटी रुपये राज्य सरकार, तर 21 कोटी रुपये मंदिर समिती आणि उर्वरित रक्कम केंद्र सरकार खर्च करणार आहे. आज मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान महाकाल कॉरिडॉरची आणि सांस्कृतिक कार्यक्रम स्थळाची तसेच तयारीची पाहणी करतील. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण होईल. त्यासाठीची जय्यत तयारी सध्या सुरु आहे.