नवी दिल्ली : नोटबंदीनंतर केंद्र सरकार आता विविध राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अधिकाऱ्यांना राज्यांच्या दौऱ्यावर पाठवणार आहे. केंद्र सरकारने यासाठी 27 पथकं तयार केली असून ही पथकं विविध राज्यांमध्ये परिस्थिती कशी आहे, याचा आढावा घेऊन सरकारला अहवाल देणार आहेत.
डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग विभागाच्या वतीने याबाबतचं प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलं आहे. सरकारने काढलेल्या आदेशांची अंमलबजावणी कशा प्रकारे केली जात आहे, याचा आढावा ही पथकं घेणार आहेत.
डिपार्टमेंट ऑफ पर्सनल अँड ट्रेनिंग विभागाने अधिकाऱ्यांची नावे देखील निश्चित केल्याची माहिती आहे. मात्र कोणते अधिकारी कोणत्या राज्यांचा दौरा करणार, याचा अंतिम निर्णय अर्थ मंत्रालय घेणार आहे.
दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालय 9 नोव्हेंबरपासून राज्यातील परिस्थीतीचा प्रत्येकी दोन तासांनी आढावा घेत आहे. शिवाय भाजप खासदारांना देखील आपापल्या जिल्ह्यात दौरा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.