नवी दिल्ली : केंद्र सरकारने सूर्यफूलाच्या बियांचे आयात शुल्क 30 टक्क्यांवरुन 10 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दुसरीकडे साखरेच्याही आयात शुल्कामध्ये कपात करण्याची शक्यता आहे. सूर्यफूल बियांच्या आयात शुल्क कपातीसंदर्भात सरकारच्यावतीने शुक्रवारी अध्यादेश काढून ही कपातीची घोषणा केली.
गेल्या अनेक वर्षांपासून तेल उत्पादक कंपन्यांकडून होणाऱ्या मागणीला सरकारने हिरवा कंदील दाखवला असून, सरकारने सूर्यफूलाच्या बियांच्या आयात शुल्कात 20 टक्क्यांनी कपात केली आहे. याआधी सूर्यफूलांच्या बियांवर 30 टक्के आयात शुल्क आकारले जात होते. पण आता त्यामध्ये 20 टक्क्यांनी कपात करुन 10 टक्के केली आहे. पण दुसरीकडे मोहरी आणि सोयबीनच्या आयात शुल्कामध्ये सरकारने कोणत्याही प्रकारची कपात केली नाही.
सरकारने आज प्रसिद्ध केलेल्या अध्यादेशानुसार ही कपात 1 एप्रिलपासून लागू असणार आहे. सरकारच्या या निर्णयाचं तेल उद्योगातील कंपन्यांनीही स्वागत केलं आहे. सध्या देशात सूर्यफूलाच्या बियांचं उत्पादन कमी होतं. मात्र, सूर्यफूल तेलाचं उत्पादन आणि मागणी मोठी आहे. त्यामुळे सूर्यफूल तेलाची मागणी पूर्ण करण्यासाठी कंपन्यांना आयात करण्याशिवाय पर्याय नसायचा. पण या निर्णयानंतर तेल आयात करण्याऐवजी बिया आयात करुन देशातंर्गत सूर्यफूलाच्या तेलाचे उत्पादन वाढवण्याचं सरकारचं लक्ष्य आहे.
गेल्या काही वर्षांपासून सूर्यफूल तेलाची वार्षिक आयात 15 लाख टनाहून आधिक आहे. 2015-16 या वर्षात देशात तब्बल 15.16 लाख टन सूर्यफूल तेल आयात करावं लागलं. तर 2014-15 मध्ये 15.42 लाख टन सूर्यफूल तेल आयात केलं गेलं.
तर दुसरीकडे साखरेच्या आयात शुल्कामध्येही सरकार कपात करण्याची शक्यता आहे. सध्या साखरेवर 40 टक्के आयात शुल्क आकारलं जातं, यामध्येही मोठी कपात होण्याची शक्यता आहे.