नवी दिल्ली : एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच भविष्य निर्वाह निधीची शेअर मार्केटमध्ये ईटीएफच्या माध्यमातून होणारी गुंतवणूक वाढवण्याचा विचार सरकार करत आहे. सध्या ईपीएफच्या एकूण जमा निधीपैकी 10 टक्के निधी हा ईटीएफमार्फत भांडवली बाजारात गुंतवला जातो.


गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यापासून हे प्रमाण 5 टक्क्यांवरून दहा टक्के करण्यात आलं होतं. आता हे प्रमाण सध्याच्या 10 टक्क्यांवरून 15 टक्के करण्याचा विचार आहे.

केंद्रीय कामगार कल्याण मंत्री बंडारू दत्तात्रय यांनी ही माहिती दिली. ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाच्या आगामी बैठकीत त्यावर अंतिम निर्णय होईल, अशी माहितीही त्यांनी दिली. पुढील महिन्यात पीएफच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक आहे. त्यातील विचारविनिमयानंतर अंतिम निर्णय कामगार कल्याण मंत्रालय घेणार आहे.

केंद्रीय सार्वजनिक उद्योगाच्या ईटीएफमध्ये पीएफओने पहिल्या टप्प्यात 3000 कोटी रूपयांची रक्कम गुंतवली आहे. त्यावर सध्या दरसाल दर शेकडा 8.7 ते 8.8 दराने परतावा मिळत असल्याचंही बंडारू दत्तात्रय यांनी सांगितलं.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधीकडे सध्या 8.70 लाख कोटी रूपयांचा निधी जमा आहे. त्यातील 15 टक्के हिस्सा ईटीएफच्या माध्यमातून शेअर बाजारात गुंतवला जाणार आहे.