नवी दिल्ली : केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेंशनधारकांसाठी खुशखबर आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सात टक्के महागाई भत्ता मिळतो. आता दोन टक्क्यांच्या वाढीनंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता नऊ टक्क्यांवर पोहोचला आहे.

मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर 1 जुलैपासून हा निर्णय लागू होईल. देशभरात 48 लाखांपेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी आहेत. तर 61 लाखांपेक्षा जास्त पेंशनधारक आहेत.

सातव्या वेतन आयोगात निश्चित केलेल्या फॉर्म्युल्यानुसार महागाई भत्त्यात वाढ झाली आहे. याआधी मार्च महिन्यातच महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ झाली होती. ही वाढ 1 जानेवारीपासून लागू झाली होती.

महागाई भत्ता म्हणजेच डिअरनेस अलाऊन्स हा सरकारी कर्मचारी, सार्वजनिक क्षेत्रातील कर्मचारी आणि पेंशनधाकरांना मिळते. वाढती महागाई आणि कर्मचाऱ्यांच्या बेसिक सॅलरीच्या आधारावर महागाई भत्ता ठरवला जातो.