नवी दिल्ली : पैसे, दागिन्यांसाठी चोरी झाल्याच्या घटना आपण कायम ऐकतो. पण दिल्लीत एका चोराने चक्क प्रोटीनची चोरी केली. 20 वर्षांचा हा हडकुळा चोर, ज्याचं वजन केवळ 35 किलो असावं, त्याने पिळदार शरीरयष्टीसाठी प्रोटीन सप्लिमेंटची चोरी केली. रोहिणीतील सेक्टर-8 मधील प्रोटीन शॉपमध्ये सोमवारी दुपार ही घटना घडली.


किरकोळ शरीरयष्टी असल्यामुळे या चोराला कोणीतरी सप्लिमेंट पावडर घेण्याचा सल्ला दिला. मग आरोपी तरुण मित्रांसह प्रोटीन सप्लिमेंट विकणाऱ्या दुकानात गेला. दुकानदाराच्या डोक्याला पिस्तूल लावून, लाखो रुपयांच्या प्रोटीन बॅग घेऊन तो पसार झाला. पोलिसांच्या तावडीत सापडू नये यासाठी त्याने दुकानात लावलेल्या सीसीटीव्हीचा डीव्हीआरही (रेकॉर्डर) सोबत घेऊन गेला.

सिक्स पॅकच्या हट्टापायी चुकीचा आहार, तरुणाच्या हृदयात ब्लॉकेज

नेमकं काय घडलं?
या प्रोटीन शॉपमध्ये सोमवारी दुपारी किरकोळ शरीरयष्टीचा आरोपी आला आणि त्याने पिळदार बॉडी बनवण्यासाठी पावडर मागितली. प्रमाणापेक्षा जास्त प्रोटिन खाणं आरोग्यासाठी अपायकारक असून यासाठी जिम ट्रेनरचा सल्ला घे, असं दुकानदाराने त्याला सांगितलं. मात्र आरोपीने आपला हट्ट सोडला नाही, परंतु दुकानदारही आपल्या मतावर कायम राहिल्याने तो तिथून निघून गेला.

थोड्या वेळात आरोपी परत आला आणि दुकानदाराला ब्रॅण्ड लिहून देण्यास सांगितलं. दुकानदाराने लिहायला सुरुवात केली असता, आरोपीने त्याचा हात मुरगळला आणि डोक्याला पिस्तूल लावून धमकी दिली. याचवेळी आरोपीचे दोन मित्र दुकानात आले आणि लाखो रुपयांचे प्रोटिनची पाकिटं आणि औषधं घेऊन पसार झाले.

उत्तर रोहिणीमधील पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे.