नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाशी संबंधित काही अकाउंटवर बंदी घालावी असा केंद्र सरकारने आदेश दिला असतानाही ट्विटरने तसं करायला नकार दिला होता. त्यावरुन आता ट्विटरला झटका देण्यासाठी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयानं स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग साईट कू (Koo) वर अकाउंट उघडलं. त्यानंतर कू च्या डाऊनलोडमध्ये वाढ झाली असून पाच दिवसात तब्बल नऊ लाख लोकांनी डाऊनलोड केले आहे.


कू हे एक ट्विटर प्रमाणेच पण स्वदेशी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म आहे. हे वेबसाइटवर आणि गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. आकड्यांमध्ये बोलायचं झालं तर गेल्या वर्षभरात 26 लाख कू अॅप इन्स्टॉल केले आहे. परंतु हैराण करणारी गोष्ट म्हणजे 6 ते 11 फेब्रुवारी दरम्यान म्हणजे पाच दिवसात नऊ लाखांपेक्षा जास्त वेळा इन्स्टॉल करण्यात आले आहे.


ट्विटरला आता स्वदेशी कू पर्याय ठरतोय का, किंवा केंद्रातील सरकार ट्विटरला पर्याय देण्याचा प्रयत्न करतंय का अशी चर्चा सुरु आहे. रेल्वेमंत्री पीयुष गोयल आणि अनेक मंत्र्यांनी कू अॅप वापरण्याचे आवाहन केले आहे. तसेच अनेकांनी कू अॅपच्या समर्थनाथ ट्वीट केले आहे. जसा टीवटीव करणारा निळा पक्षी ट्विटरचा लोगो आहे त्याप्रमाणे कूकू करणारा पिवळा पक्षी कू चा लोगो आहे.


ट्विटरप्रमाणे यावरही आपण आपले विचार मांडू शकतो. यात आपले मत मांडण्यासाठी 400 शब्दांची मर्यादा आहे. इथेही आपल्याला हव्या त्या व्यक्तीला आपण फॉलो करु शकतो. कू या अॅपचा विकास बॉम्बीनेट टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या बंगळुरुतील कंपनीने केला आहे. याची सुरुवात 2015 साली करण्यात आली आहे. कू ने केंद्र सरकारचा आत्मनिर्भर इनोव्हेशन चॅलेन्ज पुरस्कार जिंकला आहे. या अॅपच्या निर्मात्याचं नाव Aprameya Radhakrishna असं आहे.


संबंधित बातम्या :


Koo app: ट्विटरला पर्याय ठरु पाहणारे स्वदेशी अॅप Koo काय आहे?



माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा ट्विटरला झटका, स्वदेशी मायक्रो ब्लॉगिंग साईट Koo वर अकाऊंट ओपन