Government on Monkeypox : कोरोना प्रादुर्भावापाठोपाठ जगाची धाकधूक आता मंकीपॉक्सनं वाढवली आहे. जगभरात मंकीपॉक्सच्या रुग्णसंख्येत हळूहळू वाढ होत आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं आहे. केंद्र सरकारनं हे प्रकरण गांभीर्यानं घेत आंतरराष्ट्रीय विमानतळं, बंदर आणि देशाच्या सीमाभागांत लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. अशातच, आफ्रिकेतून येणाऱ्या ज्या प्रवाशांमध्ये लक्षणं दिसून येतील. त्यांचे नमुने पुढील तपासणीसाठी पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV) येथे पाठवले जातील.


एका वरिष्ठ अधिकार्‍यानं एएनआयला सांगितलं की, एनआयव्ही, पुणे येथे फक्त अशाच रुग्णांचे नमुने पाठवण्यात येणार आहेत, ज्यांच्यात काही लक्षणं आढळून येतील. ANI कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारनं नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (NCDC) आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांना युरोप आणि इतरत्र ताज्या परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवण्यास सांगितलं आहे. दरम्यान, भारतात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळून आलेला नाही. 


ब्रिटेनमध्ये कोरोना पाठोपाठ मंकीपॉक्सचा वाढता प्रादुर्भाव


ब्रिटनच्या आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशात एकूण 20 रुग्णांना मंकीपॉक्सची लागण झाली आहे. फक्त एका इंग्लंड शहरात मंकीपॉक्सचे 11 रुग्ण आढळले आहेत. ब्रिटन सरकारनं शुक्रवारी यासंदर्भात माहिती देताना, मंकीपॉक्सचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी फायदेशीर ठरणारी लस मिळवण्यासाठी सरकारकडून जोमाने प्रयत्न करण्यात येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. मंकीपॉक्स हा देवी रोगासारखाच आजार आहे. 


मंकीपॉक्सची लक्षणं काय? 


तज्ज्ञांच्या मते 'मंकीपॉक्स' हा एक दुर्मिळ विषाणू आहे. ताप आलेल्या व्यक्तीमध्ये जे सामान्य लक्षणे दिसतात, तीच लक्षणे यात दिसून आली आहेत. यामध्ये संक्रमित व्यक्तीच्या संपूर्ण शरीरावर आणि चेहऱ्यावर पुरळ दिसू लागते. याशिवाय ताप, स्नायू दुखणे, डोकेदुखी, थंडी वाजून येणे आणि थकवा अशी लक्षणे दिसू शकतात.


कसा वाढतो संसर्गाचा धोका?


संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या लोकांना या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो. हा विषाणू त्वचा, श्वसनमार्गातून किंवा डोळे, नाक आणि तोंडातून आपल्या शरीरात प्रवेश करू शकतो. तसेच, संक्रमित प्राणी देखील या विषाणूचे सक्रिय वाहक असू शकतात. अशा प्राण्याच्या संपर्कात आल्याने, किंवा विषाणू-दूषित वस्तूंद्वारे देखील ‘मंकीपॉक्स’ पसरू शकतो. डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये ‘मंकीपॉक्स’ची सर्वाधिक प्रकरणे आढळतात. मुख्यतः आंतरराष्ट्रीय प्रवासामुळे किंवा आयात केलेल्या प्राण्यांमुळे हा विषाणू पसरतो.


महत्त्वाच्या इतर बातम्या :