मुंबई : मागील एक वर्षात केंद्र सरकारने 70 लाख नोकऱ्या दिल्या आहेत, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. विरोधकांनी जनतेसमोर चुकीचं चित्र तयार करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोपही मोदींनी केला आहे.

स्वराज पत्रिकेला दिलेल्या मुलाखतीत नरेंद्र मोदींनी देशातील रोजगाराच्या मुद्यावरुन विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर दिले. मोदी म्हणाले की, “रोजगाराच्या मुद्यावरुन विरोधक आमच्यावर करत असलेल्या टीकेबद्दल आम्ही त्यांना दोष देत नाही. पण त्यांच्याकडे रोजगाराबाबत चुकीचे आकडे आहेत. नव्या अर्थव्यवस्थेत तयार होत असलेल्या नोकऱ्या मोजण्यासाठी आपण वापरत असलेली जुनी पद्धत चुकीची आहे.”

नरेंद्र मोदींना रोजगार मोजण्याच्या अचूक पद्धतीबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले की, “आज देशभरात 15 हजारांपेक्षा अधिक स्टार्ट-अप सुरु आहेत, ज्यामुळे हजारो तरुणांना रोजगार मिळत आहेत. या स्टार्ट-अप योजनांना सरकारकडून विविध प्रकारे मदत केली जात आहे.”

“देशभरात गेल्या वर्षभरात एक कोटी नवीन घरांची निर्मिती करण्यात आली. तसंच रस्ते निर्मितीही प्रतिमहिना दुप्पट वेगाने होत आहे. या सगळ्यातून लोकांना निश्चितच रोजगार मिळाला आहे,” असा दावा पंतप्रधान मोदींनी केला आहे.

दरम्यान, देशात एक कोटी रोजगार निर्माण करु, असं आश्वासन नरेंद्र मोदींनी 2014 च्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान दिलं होतं.