हैदराबाद: हैदराबादमध्ये आयटी अर्थात तंत्रज्ञानाची क्रांती करणारे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू हे 'सायबर बाबू' म्हणून ओळखले जातात. मात्र याच मुख्यमंत्र्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

जर तुम्हाला माझं सरकार आवडत नसेल, तर माझ्या सरकारकडून दिली जाणारी पेन्शन घेऊ नका. तसंच मी बनवलेल्या रस्त्यावरुन प्रवास करु नका, असं चंद्राबाबू म्हणाले.

आम्ही दिलेल्या पेन्शनचा तुम्हाला लाभ हवा आहे. आम्ही बांधलेल्या रस्त्यावरुन तुम्हाला प्रवास करायचा आहे. मात्र आम्हाला मतदान करायचं नाही. हा कसला न्याय आहे? असा सवाल चंद्राबाबूंनी केला.

तेलगु देसम पार्टी अर्थात टीडीपीच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

जर तुम्हाला माझं सरकार आवडत नसेल, तर तुम्ही पेन्शन घेऊ नका आणि रस्तेही वापरु नका, असं चंद्राबाबू म्हणाले.

सरकार जनतेसाठी खूप कामं करतंय, त्यामुळे त्यांच्याकडे हक्काने मतं मागा, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला.

"आम्ही एवढं करुनही जर कोणी आपल्याला मतदानास नकार दिला, तर त्याबाबतचं कारण विचारा. अशा गावांकडे दुर्लक्ष करण्यास मी घाबरणार नाही", असंही चंद्राबाबूंनी नमूद केलं.

आम्ही शेतकऱ्यांचं दीड लाखांपर्यंतचं पीककर्ज माफ केलं. वृद्धांना पेन्शन सुरु केली. निराधार आणि अपंगांना 200 ते एक हजार रुपयांपर्यंतची पेन्शन दिली. विकासकामासाठी अनेक सुविधा राबवल्या, असं चंद्रबाबूंनी सांगितलं.

भ्रष्टाचार करुन पैसा कमावलेल्या राजकारण्यांना 500-1000 रुपयांत तुम्ही तुमचं मत विकून भविष्य खराब का करुन घेता, असाही सवाल त्यांनी केला.

"काही राजकीय पक्षही भ्रष्टाचार करुन कमावलेला पैसा निवडणुकीत मतदारांना वाटतात. मी सुद्धा प्रत्येक मताला 2 ते 5 हजार रुपये देऊ शकतो" असं चंद्राबाबूंनी सांगितलं.