मुंबई : शहनाईसारख्या अवघड वाद्यातील सुरावट अत्यंत नजाकतीने मांडणाऱ्या भारतरत्न उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांची आज 102 वी जयंती आहे. हे निमित्त साधत इंटरनेट जगतातील जायंट मानल्या जाणाऱ्या गूगलने आपल्या होमपेजवर डूडलद्वारे बिस्मिल्ला खाँ यांना आदरांजली अर्पण केली आहे.
उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांचा जन्म 21 मार्च 1916 रोजी बिहारमधील डुमरांवमध्ये झाला. कमरुद्दीन हे मूळ नाव, मात्र पुढे त्यांच्या आजोबांनी 'बिस्मिल्ला' म्हणण्यास सुरुवात केली आणि पुढे त्याच नावाने जग त्यांना ओळखू लागले. धार्मिक सौहार्दाचे प्रतिक म्हणूनही बिस्मिल्ला खाँ यांना ओळखलं जातं.
वयाच्या 14 व्या वर्षी म्हणजे 1937 साली त्यांनी कोलकात्यातील ऑल इंडिया म्युझिक कॉन्फरन्समध्ये सार्वजनिक व्यासपीठावरुन पहिल्यांदा शहनाईचे वादन केले. त्यानंतर त्यांनी वाद्यसंगीतात स्वत:ला झोकून दिले. ते आपल्या शहनाईला 'बेगम' म्हणत असत.
भारतरत्न (2001), पद्मविभूषण (1980), पद्मभूषण (1968), पद्मश्री (1961), संगीत नाटक अकादमी फेलोशिप (1994), संगीत नाटक अकादमी पुरस्कार (1956), तानसेन पुरस्कार इत्यादी अनेक मानद पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. इराण सरकारकडून देण्यात येणाऱ्या ‘तलार मौसिक’ या पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले होते.
बनारस हिंदू विद्यापीठ आणि विश्व भारती विद्यापीठातर्फे त्यांना मानद डॉक्टरेटही देण्यात आली.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारताच्या स्वातंत्र्य दिनी दिल्लीत लाल किल्ल्यावर पंतप्रधान पंडित नेहरुंच्या उपस्थितीत त्यांनी शहनाईचं वादन केले होते. त्याचसोबत, कान्स आर्ट फेस्टिव्हल, ओसाका ट्रेड फेअर, वर्ल्ड एक्स्पोझिशन, वर्ल्ड म्युझिक इन्स्टिट्युट इत्यादी अनेक सोहळ्यांमध्येही त्यांनी शहनाई वादन केले आहे.
बिस्मिल्ला खाँ यांच्या नावाने नवी दिल्लीतील संगीत नाटक अकादमीतर्फे 2007 पासून 'उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्कार' दिला जातो. संगीत, नाटक आणि नृत्य या क्षेत्रातील मान्यवरांचा या पुरस्काराने सन्मान केला जातो.
21 ऑगस्ट 2006 रोजी कार्डिअॅक अरेस्टने बिस्मिल्ला खाँ यांचा मृत्यू झाला.