मुंबई: आज भारताचा 73 वा स्वातंत्र्यदिन आहे, संपूर्ण देशभरात हा दिवस विविध पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आज गूगलने डूडल तयार केले आहे.  भारतीय कलाकार शैवलिनी कुमार यांनी हे डूडल तयार केले आहे. या चित्रात शिक्षण, कला, धैर्य आणि करुणा यासारख्या भारतीय संस्कृतीचे जटिल परंतु सुसंवादी असं पॅचवर्क आहे.


भारताचं प्रतिक म्हणून भारतीय लोकसभा, रिक्षा, चांद्रयान, पतंग, मोरपंख आणि राष्ट्रीय प्राणी वाघ या सर्व गोष्टींचा या पॅचवर्कमध्ये समावेश केला आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त देशभरातील 120 कोटी नागरिक आज हा सोहळा साजरा करणार आहेत तसेच नवी दिल्लीत लाल किल्ल्यावर परंपरेप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सकाळी तिरंगा फडकवण्यात आला. पंतप्रधान मोदींनी ध्वजारोहणानंतर देशाला संबोधनदेखील केले. यावेळी त्यांनी तिहेरी तलाकापासून कलम 370 पर्यंत बऱ्याच विषयावर भाष्य केलं.


गूगलसोबतच यंदा ट्विटरवर स्वातंत्र्यदिनानिमित्त वापरल्या जाणाऱ्या हॅशटॅगसोबत अशोकचक्राची इमोजीदेखील पाहायला मिळत आहे. मराठीसह देशातल्या 10 प्रमुख भाषांमध्ये (इंग्लिश, हिंदी, गुजराती, तमिळ, बंगाली, पंजाबी, मल्याळम, ओडिया, कानडी, तेलुगू) हॅशटॅग बनवण्यात आले आहेत.