Bank Strike in December 2021 : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी संप दोन दिवसांचा संप पुकारला आहे. सार्वजनिक बँकाच्या खासगीकरणाबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाविरोधात हा संप पुकारण्यात आला आहे. देशातील सरकारी बँकांचे कर्मचारी 16 आणि 17 डिसेंबर रोजी संप पुकारणार आहेत. या संपामुळे दोन दिवस बँकांचे कामकाज ठप्प होणार आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनने (UFBU-United Forum of Bank Unions) संपाची हाक दिली आहे.
अर्थसंकल्पीय भाषणात केली होती घोषणा
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2021 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात बँकांच्या खाजगीकरणाची घोषणा केली होती. आता सरकारने त्यादृष्टीने वेगाने तयारी सुरू केली आहे. याशिवाय सरकार या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक आणण्याच्या तयारीत असल्याचेही सांगण्यात येत आहे.
संपात नऊ संघटनांचा सहभाग
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (UFBU) सरकारकडून सुरू असलेल्या बँक खाजगीकरणाच्या तयारीच्या निषेधार्थ संपाची घोषणा केली आहे. UFBUमध्ये बँक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या 9 संघटनांचा समावेश आहे.
UFBU कडून खाजगीकरणाला विरोध
सरकारने बँकिंग कायदा विधेयक, 2021 संसदेच्या सुरू असलेल्या अधिवेशनात सादर करण्यासाठी आणि त्याला मंजूर करण्यासाठी कामकाजात सूचीबद्ध केले आहे. UFBUने बँकांच्या खाजगीकरणाच्या हालचालीला विरोध करण्याचा निर्णय घेतला आहे, असे ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) सरचिटणीस सी. एच. वेंकटचलम यांनी म्हटले आहे.
संपाव्यतिरिक्त डिसेंबर महिन्यात 10 दिवस बँकांमध्ये कामकाज होणार नाहीत. यामध्ये दुसऱ्या आणि चौथ्या शनिवार, रविवारचा समावेश आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- सरकार देणार दरमहा 3000 रुपये; नोव्हेंबर महिन्यात 46 लाखजणांनी केली नोंदणी, जाणून घ्या योजना
- IPO updates: दस का दम! डिसेंबर महिन्यातही येणार 10 आयपीओ
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha