मुंबई : सोन्याला पुन्हा एकदा झळाळी आली आहे. सोन्याच्या दराने गेल्या सहा वर्षातील उच्चांक गाठला आहे. सोन्याचा दर प्रतितोळा 34 हजारांच्या वर गेला आहे. सोन्यासाठी प्रतितोळा 34, 588 रुपये मोजावे लागत आहेत. अमेरिका आणि इराणमधील वाढता तणाव, विविध देशांसमोबत अमेरिकेचा सुरु असलेला व्यापार आणि केंद्रीय बँकांचा व्याजदर कपातीचा निर्णय यामुळे सोन महागलं आहे.

येत्या काही दिवसात सोन्याचा दर आणखी वधारण्याची शक्यता आहे. दिवाळीपर्यंत सोन्याचा दर 38 हजार रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. जून महिन्यात सोन्याच्या दरात सुमारे 10 टक्के तेजी आली आहे आणि ती पुढेही सुरु राहू शकते. जागतिक बाजारातही मंगळवारी (25 जून) सोन्याचा दर 1439.7 डॉलर प्रति औंसपर्यंत पोहोचला होता. सप्टेंबर 2013 नंतर सोन्याचा दर सर्वोच्च स्तरावर पोहोचला आहे, असं जाणकारांनी सांगितलं.

अमेरिका, चीन, युरोपमधील काही देश, इंग्लंड आणि भारत यांसारख्या काही मोठ्या अर्थव्यवस्था व्याजदरात सातत्याने कपात करत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार गुंतवणुकीसाठी सोन्याला पसंती देत असल्याचं जाणकार सांगतात.