गोवा : परतीच्या पावसाचा फोंडा तालुक्याला जोरदार तडाखा बसला आहे. फोंडा तालुक्यासह धारबांदोडा व मोले भागात परतीच्या पावसामुळे लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

Continues below advertisement


काल सायंकाळी झालेल्या पाऊस व वादळी वाऱ्यामुळे फोंडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात झाडांची, घरांची पडझड झाली. उसगांव, कवळे, वेलिंग, फर्मागुडी, वारखंडे, मडकई, दाभाळ, मोले, फेंडा व इतर भागांना या वादळाचा तडाखा बसला. त्यात अनेक घरांवर झाडे कोसळल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे.


फोंडा तालुक्याबरोबर राजधानी पणजीसह राज्याच्या अनेक भागात काल पाऊस पडला. वादळी पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाल्याने वीजपुरवठ्य़ाला अडथळा निर्माण झाला. बऱ्याच ठिकाणी वीज खांब कोलमडून पडल्याने वीज प्रवाह खंडित झाला. वादळाच्या तडाख्यात रात्री मोबाईल सेवाही टप्प झाल्याने फोंडावासियांचे हाल झाले.


कदंब बसस्थानक, आल्मेदा हायस्कूल तसेच फर्मागुडी येथील जीव्हीएम परिसरात व वेलिंग येथे पार्क करून ठेवलेल्या अल्टो कार व इनोव्हा कारवर झाडे पडल्याने बरंच नुकसान झालं. वादळी वाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक गावांतील घरांवर झाड कोसळल्याने छप्पर व इतर सामानांची मोडतोड झाली.


वीज तारांवर झाडे पडल्याने खंडित झालेला वीज पुरवठा पूर्वपदावर आणण्यासाठी युद्ध पातळीवर काम सुरु आहे. वीज प्रवाह खंडीत झाल्याने रात्रीच्या अंधारात फोंडा अग्निशामक दल व इतर यंत्रणाना मदतकार्यात अडथळे निर्माण झाले.


पार उसगांव येथे गोवा-बेळगाव राष्ट्रीय महामार्गावर माड उन्मळून पडल्याने काही काळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. तसेच अन्य झाडेही पडली. पडलेली झाडे हटवून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. अडचणीच्या ठिकाणी कोसळून पडलेली झाडे प्राधान्यक्रमाने हटविण्यात आली.