पणजी : गोव्यात एका रशियन नागरिकाने 6 वर्षीय मुलीचे शोषण केल्याची घटना घडली असून या प्रकरणातील आरोपी हा देश सोडून पळून गेल्याचं समोर आलं आहे. ही घटना 4 आणि 5 फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली. इल्या वासुलेव असं आरोपीचं नाव असून त्याच्यावर पॉक्सो (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


 इल्या वासुलेव याने उत्तर गोव्यातील अरामबोल येथे नाईट कँपचे आयोजन केले होते. जिथे त्याने 6 वर्षीय अल्पवयीन रशियन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. ही घटना 4 आणि 5 फेब्रुवारीच्या मध्यरात्री घडली.


पीडितेच्या पालकांनी 19 फेब्रुवारी रोजी तक्रार दाखल केली. IPC च्या कलम 376, GC कायद्याचे कलम 8(2) आणि POCSO कायद्याच्या कलम 4 आणि 8 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करत आहेत. या प्रकरणात आरोपी हा रशियाला पळून गेल्याचं समोर आलं आहे.त्यामुळे गोवा पोलीस आता रशियन अधिकाऱ्यांची मदत घेणार आहेत. 


या घटनेनंतर पर्यटकांची पहिली पसंती असलेल्या गोव्यातील पर्यटकांच्या सुरक्षेवरून आम आदमी पक्षाने गोव्याच्या प्रमोद सावंत सरकारला धारेवर धरले आहे. गोवा आम आदमी पार्टीचे प्रमुख अमित पालेकर म्हणाले की, हे केवळ एक प्रकरण समोर आले आहे. परंतु सरकार गोव्याच्या संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष देत नाही आणि सरकारला गोव्यातील लोकांच्या सुरक्षेची काळजी नाही.


गोव्यात गुन्ह्यांच्या घटना वाढत आहेत


गोव्याच्या पर्यटन उद्योगातून गोवा राज्याला चांगले उत्पन्न मिळते आणि अशा घटनांमुळे तेथील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. गोवा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीने महिला पर्यटकांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. गोवा चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीने 2023 मध्ये केलेल्या सर्वेक्षणात दावा केला होता की 42 टक्के लोकांचा असा विश्वास आहे की राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळत आहे, ज्यामुळे पर्यटनावर परिणाम होत आहे.


पर्यटकांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये 15 टक्के वाढ


नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, 2020 आणि 2021 मध्ये पर्यटकांशी संबंधित गुन्ह्यांमध्ये 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. असा दावाही केला जात आहे की, सध्याच्या परिस्थितीची कोविडपूर्वीच्या वर्षांशी तुलना केली तर पूर्वीच्या तुलनेत पर्यटकांमध्ये 12 टक्के घट झाली आहे. 


लोकांचा कायदा आणि सुव्यवस्थेवरील विश्वास उडाला आहे, हे या घसरणीचे कारण असल्याचा दावा केला जात आहे. ज्याचा परिणाम स्थानिक व्यवसाय, टॅक्सी चालक आणि विक्रेत्यांवर होत आहे. आता मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासमोरही कायदा आणि सुव्यवस्था सुधारण्याचे मोठे आव्हान आहे.