पणजी : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे बंद पडलेला गोव्यातील खाण उद्योग लवकरात लवकर सुरु व्हावा, यासाठी केंद्र सरकारने सहकार्य करावे, असे साकडे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घातले.


दुसऱ्या टप्प्यातील उपचारासाठी अमेरिकेस जाण्यापूर्वी मुख्यमंत्री पर्रिकर यांनी आज दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदी आणि खाणींसाठी स्थापन केलेल्या 3 मंत्र्यांच्या गटाची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

पर्रिकर यांच्या सोबत केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार तथा भाजपचे गोवा प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर, दक्षिण गोव्याचे खासदार नरेंद्र सावईकर उपस्थित होते.

खाणी सुरु व्हाव्यात यासाठी पावसाळी अधिवेशनात एकमताने करण्यात आलेला ठराव पर्रिकर यांनी पंतप्रधान मोदी यांना सादर केला.

पर्रिकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मंत्रीगटाचे अध्यक्ष तथा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन गोव्यात लवकरात लवकर खाणी सुरु व्हाव्यात यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.

यावेळी खाणमंत्री नरेंद्र सिंह तोमर,कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद, नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत आणि संबंधीत खात्याचे सचिव यावेळी उपस्थित होते.

दरम्यान, मुख्यमंत्री पर्रिकर यांच्याकडून खाणींची समस्या जाणून घेतल्या नंतर पंतप्रधान मोदी यांनी आपण यात लक्ष घालून आवश्यक ते प्रयत्न करेन असे आश्वासन दिल्याचे सांगण्यात येत आहे.या दिल्ली दौऱ्यातून खाणी सुरु होण्या बाबत सकारात्मक गोष्टी समोर येतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे.