चेन्नई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि डीएमकेचे सर्वेसर्वा एम. करुणानिधी यांचं वयाच्या 94 व्या वर्षी निधन झालं. करुणानिधी हे त्यांच्या कारकिर्दीत 12 वेळा आमदार म्हणून निवडून आले. तसेच, त्यांनी तामिळनाडू राज्याचं पाचवेळा मुख्यमंत्रिपद भूषवलं आहे.


28 जुलै रोजी करुणानिधी यांना चेन्नईतील कावेरी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यानच आज संध्याकाळी 6.10 वाजता कावेरी रुग्णालयात करुणानिधींनी अखेरचा श्वास घेतला.

कावेरी रुग्णालयाचे कार्यकारी संचालक डॉ. अरविंदन सेल्वराज यांनी पत्रक काढून, करुणानिधी यांच्या निधनाची माहिती दिली.

दरम्यान, करुणानिधी यांच्या निधनामुळे तामिळनाडू सरकारने एक आठवड्याचा दुखवटा जाहीर केला असून, उद्या (8 ऑगस्ट) शासकीय सुट्टी घोषित केली आहे.

सिनेमा ते सीएम... करुणानिधी यांचा राजकीय प्रवास

चित्रपटांपासून सुरु होऊन मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचलेला करुणानिधी यांचा प्रवास अत्यंत रंजक आहे.

चित्रपटातून राजकारणाकडे वळण्याचा ट्रेण्ड दक्षिण भारतात जुना आहे. करुणानिधी यांनी तामिळ मनोरंजनविश्वात नाटककार आणि पटकथा लेखक म्हणून काम केलं आहे. करुणानिधींच्या चाहत्यांनी त्यांना 'कलैनर' हे नाव बहाल केलं आहे. कलैनर म्हणजे तामिळ भाषेत कलेतील विद्वान.

करुणानिधी पाच वेळा तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत, तर बारा वेळा ते विधानसभेवर निवडून आले होते. भारतीय राजकारणात करुणानिधी यांना अनन्यसाधारण स्थान आहे.

बालवयात राजकारणात प्रवेश

करुणानिधी यांनी वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी राजकारणात पाऊल ठेवलं होतं. दक्षिण भारतातील हिंदी विरोधी आंदोलनात ते सहभागी झाले होते. 1937 मध्ये शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य केल्याने युवकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला होता.

करुणानिधी यांनी तामिळ भाषेतच नाटकं लिहिण्यास सुरुवात केली. तामिळ भाषेवरील त्यांचं प्रभुत्व पाहून सामाजिक नेते पेरियार आणि द्रमुकचे तत्कालीन प्रमुख अन्नादुराई यांनी त्यांना 'कुदियारासु' वाहिनीचे संपादक केलं.

पेरियार आणि अन्नादुराई यांच्यात मतभेद झाल्यानंतर करुणानिधी अन्नादुराई यांच्यासोबत गेले. त्यानंतर करुणानिधींना मागे वळून पहावं लागलं नाही.

नेहरु पंतप्रधान असताना पहिल्यांदा आमदार

तिरुचिरापल्ली जिल्ह्यातील कुलिथालाई विधानसभा क्षेत्रातून करुणानिधी 1957 साली पहिल्यांदा निवडून आले. त्यावेळी पंडित जवाहरलाल नेहरु भारताचे पंतप्रधान होते.

करुणानिधी 1961 मध्ये द्रमुकचे कोषाध्यक्ष झाले. 1962 मध्ये ते तामिळनाडू विधानसभेत विरोधीपक्षाचे उपनेते झाले. 1967 मध्ये द्रमुक सत्तेत येताच त्यांना सार्वजनिक कार्यमंत्री झाले.

द्रमुकची धुरा

करुणानिधी यांनी 1969 मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्याच वर्षी द्रमुकचे संस्थापक सीएन अन्नादुराई यांचं निधन झाल्यावर पक्षाचं नेतृत्व करुणानिधींकडे सुपूर्द करण्यात आलं.

करुणानिधी पहिल्यांदा (1969) आणि दुसऱ्यांदा (1971) तामिळनाडूचे सीएम झाले, त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. त्यांनी तिसऱ्यांदा (1989) मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, तेव्हा राजीव गांधी पीएम होते. चौथ्यांदा (1996) करुणानिधी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले, तेव्हा नरसिम्हा राव पंतप्रधानपदी होते. पाचव्यांदा (2006) करुणानिधींनी तामिळनाडूचं मुख्यमंत्रिपद स्वीकारलं तेव्हा देशाची धुरा मनमोहन सिंग यांच्या खांद्यावर होती.

कौटुंबिक जीवन

करुणानिधी यांचं तीन वेळा लग्न झालं. त्यांची पहिली पत्नी पद्मावती यांचं निधन झालं. एमके मुथू हे त्यांचे सुपुत्र. दुसरी पत्नी दयालु अम्माल यांच्यापासून एमके अलागिरी, एमके स्टॅलिन, एमके तमिलरासू हे पुत्र आणि सेल्वी ही कन्या आहे. तिसरी पत्नी रजति अम्मालपासून कनिमोळी ही कन्या आहे.

दिग्गजांकडून करुणानिधी यांना श्रद्धांजली

"करुणानिधी यांच्या निधनाने दु:ख झालं. ते भारतातील ज्येष्ठ नेते होते. ते खऱ्या अर्थाने लोकनेते होते. त्यांच्या रुपाने विचारवंत आणि लेखकही आपण गमावला. जनकल्याणासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलं.", अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

"आजचा दिवस माझ्यासाठी काळा दिवस आहे. कारण ज्यांना मी कधीच विसरु शकत नाही, अशा करुणानिधी यांचं आज निधन झालं. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी मी प्रार्थना करतो.", अशा भावना अभिनेते रजनीकांत यांनी व्यक्त केल्या.

“डीएमकेचे अध्यक्ष आणि तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम. करुणानिधी यांचं निधन झाल्याचं कळल्यावर खूप दु:ख झालं. जनतेतून आलेले नेते म्हणून त्यांची कायमच आठवण राहील. करुणानिधी यांच्या कुटुंबाच्या दु:खात मी सहभागी आहे”, अशा भावना माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केल्या.