पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या आजाराबद्दल सरकार आणि भाजपा या दोघांनीही माहिती देण्याचे आजपर्यंत टाळले. मात्र आज गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी मुख्यमंत्र्यांना पॅनक्रिएटिक कॅन्सर म्हणजेच स्वादुपिंडाचा कर्करोग असल्याचा खुलासा केला.
हळदोणा येथे एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना राणे यांनी हा खुलासा केला. मागील आठ महिन्यात पहिल्यांदाच सरकारी यंत्रणेने असा खुलासा केला आहे. "पर्रिकर हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि पर्रिकरांना स्वादुपिंडाचा कर्करोग आहे हे सत्य आहे, त्यात लपवण्यासारखे काही नाही", असे राणे यांनी म्हटले.
"सध्या पर्रिकर यांची प्रकृती चांगली नाही, हे सर्वांना माहीत आहे. एम्समधून त्यांना परत आणले आहे. त्यांना त्यांच्या कुटुंबासोबत शांतपणे राहू द्या", असं राणे म्हणाले. "पर्रिकरांनी राज्यासाठी खूप काही केले आहे, अशा व्यक्तीला आपल्या कुटुंबासोबत राहण्याचा अधिकार आहे" असंही राणे म्हणाले.
"काँग्रेस मुख्यमंत्र्याच्या आरोग्याविषयी बोलत आहे. जितेंद्र देशप्रभू यांनी न्यायालयात जाण्याचेही म्हटलं. त्यांना जायचे असेल तर त्यांनी जावे कोर्टात. काँग्रेसकडे मुद्दा नाही म्हणून ते पर्रिकर यांच्या आरोग्याविषयी बोलत आहेत", असं राणे म्हणाले.
संबंधित बातम्या