पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर आपल्याकडील अतिरिक्त खाती इतर मंत्र्यांकडे सोपवण्यासाठी आज सात मंत्र्यांसोबत आणि भाजपच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत दिल्लीतील एम्समध्ये सकाळी साडेदहा वाजता महत्त्वाची बैठक घेणार आहेत. या विशेष बैठकीसाठी सात मंत्री आज दिल्लीत दाखल झाले आहेत.


पितृपक्ष संपल्यानंतर मुख्यमंत्री आपल्याकडील अतिरिक्त खाती सहकारी मंत्र्यांना वाटतील असे ठरले होते. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी आज सर्वांना थेट चर्चेसाठीच बोलावले आहे. भाजपाचे मंत्री माविन गुदिन्हो, निलेश काब्राल आणि विश्वजित राणे हे बैठकीत सहभागी होणार आहेत. नगरविकास मंत्री मिलिंद नाईक बैठकीस उपस्थित राहतील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मगोपचे मंत्री सुदिन ढवळीकर आणि गोवा फॉरवर्डतर्फे मंत्री विजय सरदेसाई सहभागी होणार आहेत. पर्यटन मंत्री बाबू आजगावकर हे दिल्लीला जाणार नाहीत. ते आपल्या कौटुंबिक सोहळ्यात व्यस्त असल्याचे समजते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आणि एक-दोन पदाधिकारी बैठकीत सहभागी होण्याची शक्यता आहे. दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये मुख्यमंत्री उपचार घेत असून तिथेच बैठक होणार आहे. मुख्यमंत्री आपल्याकडील अर्थ आणि गृह खाती देणार नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. मात्र इतर महत्त्वाची खाती ते सहकारी मंत्र्यांकडे सोपवून आपल्यावरील ताण कमी करुन उपचारानंतर विश्रांती घेतील अशी चर्चा आहे.

वन, पर्यावरण, खाण, सहकार, शिक्षण, उच्च शिक्षण, तांत्रिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण, नागरी उड्डाण अशी विविध खाती तसेच गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ, मोपा प्राधिकरण, कचरा व्यवस्थापन महामंडळ अशा सरकारी संस्थांची चेअरमनपदेही पर्रिकर यांच्याकडेच आहेत. खातेवाटप आजच होणार याबद्दल निश्चितपणे सांगितले जात नाही. मंत्र्यांचे म्हणणं ऐकून मुख्यमंत्री मग स्वतंत्रपणे भाजपशी चर्चा करतील. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनाही खात्यांची यादी दाखवली जाईल. त्यानंतर निर्णय होईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.