पणजी : गोव्यात येऊन दारु पिऊन मजा करायची असे ठरवून गोव्यात येत असाल तर सावधान. कारण कळंगुट पोलिसांनी मंगळवारी (22 जानेवारी) धडक कारवाई करत कळंगुट परिसरात उघड्यावर दारु पिऊन धिंगाणा घालणाऱ्या नऊ पर्यटकांना अटक केली. यातील दोघे कोल्हापूरचे आहेत.


उघड्यावर दारु पिऊन गोंधळ घालणाऱ्या पर्यटकांचा गोव्याच्या पर्यटनाला फटका बसत असल्याच्या आरोपानंतर पोलिसांनी कडक भूमिका घेत, अशा तर्राट पर्यटकांवर कारवाई सुरु केली आहे. कळंगुटचे पोलिस निरीक्षक जीवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी ही कारवाई करण्यात आली. कळंगुटमधील पदपथ, किनाऱ्यावर आणि वाहनतळावर दारु पिणाऱ्यांविरोधात ही कारवाई करण्यात आली.

अटक करण्यात आलेल्यांमध्ये संदीप पाटील आणि नारायण पाटील या कोल्हापूर इथल्या दोन पर्यटकांचा समावेश आहे. याशिवाय हैदराबाद-आंध्रप्रदेशमधील तिरुपती गुड्डम, कपिल अंजानेलु, सतीश बाबू यांचा समावेश आहे. उर्वरीत पर्यटक कर्नाटकमधील असून त्यात सागर बेंतुर, राघवेंद्र मेघराज, रुद्रेश महेश आणि राजेश नागराजप्पा यांचा समावेश आहे.

यापुढे सर्वत्र गस्त वाढवून असे प्रकार घडत असतील तर त्यावर कडक कारवाई केली जाईल, असं दळवी यांनी स्पष्ट केलं आहे. 2018 मध्ये 35 जणांवर अशीच कारवाई कळंगुट पोलिसांकडून करण्यात आली होती.