संसदेत 15 मिनिटं द्या, मोदी उभे राहणार नाहीत : राहुल गांधी
एबीपी माझा वेब टीम | 17 Apr 2018 03:57 PM (IST)
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुलं आव्हान दिलं आहे.
NEXT PREV
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खुलं आव्हान दिलं आहे. “मला संसदेत भाषण करण्यासाठी फक्त 15 मिनिटं मिळाली तर पंतप्रधान मोदींना माझ्यासमोर उभंही राहता येणार नाही,” असं राहुल गांधी म्हणाले. राहुल गांधी म्हणाले की, “पंतप्रधान संसदेत उभं राहण्यास घाबरतात. आम्हाला संसदेत 15 मिनिटं भाषण देण्यासाठी मिळाली तर पंतप्रधान मोदी उभंही राहणार नाहीत. मग ते राफेलचं प्रकरण असो वा नीरव मोदीचं...पीएम उभंही राहणार नाहीत. राफेल विमानांच्या खरेदीवर निशाणा राफेल लढाऊ विमान खरेदी करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर काँग्रेस अध्यक्ष सुरुवातीपासूनच भाष्य करत आहेत. या खरेदीत आर्थिक अनियमितता झाल्याचा आरोप ते करत आहेत. फ्रान्समधील डसॉल्ट या कंपनीकडून भारताने लढाऊ विमान खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु मोदी सरकारने जास्त रक्कम देऊन विमान खरेदीचा करार केल्याचा विरोधकांचा आरोप आहे. शिवाय या कराराशी संबंधित अटी उघड करण्याचीही काँग्रेसची मागणी आहे. मात्र हे अतिशय संवेदशील प्रकरण असून कराराची माहिती सार्वजनिक करण्यास संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी नकार दिला आहे. बँकिंग प्रणाली उद्ध्वस्त तर पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यावरुनही काँग्रेसने मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधींनी अनेक वेळा नीरव मोदी आणि मेहूल चौकसी या दोघांनी परदेशात पळ काढल्यावरुन प्रश्न उपस्थित केले आहेत. पीएनबी घोटाळ्याबाबत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकारने बँकिंग प्रणाली उद्ध्वस्त केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. “नीरव मोदी 30,000 कोटी रुपये घेऊन फरार झाला, पण मोदींनी यावर एक शब्दही काढला नाही. मात्र आमच्या खिशातून 500-1000 रुपयांच्या नोटा हिसकावून रांगेत उभं राहण्यास भाग पाडलं. त्यांनी ह्या नोटा आमच्या खिशातून काढून नीरव मोदीच्या खिशात टाकल्या,” असं राहुल गांधी म्हणाले.