नवी दिल्ली : बनारस हिंदू विश्वविद्यापीठाच्या कुलगुरुपदी मराठमोळी व्यक्ती विराजमान झाली आहे. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु बी. ए. चोपडे यांची नियुक्ती बीएचयूच्या कुलगुरुपदी करण्यात आली आहे.
बी. ए. चोपडे यांच्या नियुक्तीला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिली आहे. बायोटेक्नॉलॉजीचे अभ्यासक असलेल्या चोपडेंची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी 4 जून 2014 रोजी नियुक्ती करण्यात आली होती. दीड वर्षांचा कार्यकाळ बाकी असताना त्यांना ही संधी मिळाली आहे.
गेल्या वर्षी बनारस हिंदू विद्यापीठात तरुणींच्या छेडछाडीचं प्रकरण समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं. बीएचयूचे तत्कालीन कुलगुरु प्रा. जी. एस. त्रिपाठी यांना दीर्घकालीन सुट्टीवर पाठवण्यात आल्यामुळे ते पद तूर्तास रिक्त आहे.
राष्ट्रपतींनी हे पद भरण्याची प्रक्रिया सुरु केली होती. नियुक्तीचं पत्र मिळाल्यानंतर कुलपती सी. विद्यासागर राव यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करुन चोपडे वाराणसीला रवाना होणार आहेत.