PM Narendra Modi photo on LPG cylinders : सध्या देशभरात महागाईनं उच्चांक गाठला आहे. त्यातच सिलेंडरच्या (LPG cylinders) किमती हजाराच्या वर गेल्यानं सर्वसामान्यांचं बजट गडबडलं आहे. या महागाईचा विरोधी पक्षांकडून वेगवेगळ्या पद्धतीनं निषेध केला जात आहे. तेलंगणामध्ये अशाच प्रकारे केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे. टीआरएसकडून (TRS) पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांचे हसतमुख फोटो सिलेंडरवर लावले गेले आहेत. अशा प्रकारचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत  आहे. 


देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण (union finance minister Nirmala Sitharaman)यांनी नुकतंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं छायाचित्र रेशन दुकानांमध्ये लावलं जावं अशी मागणी केली होती. याला टीआरएसने अशा पद्धतीनं प्रत्युत्तर दिलं आहे. सध्या सोशल मीडियावर फिरत असलेल्या एका व्हिडिओ क्लिपमध्ये गॅस सिलेंडरने भरलेल्या ऑटोतील सिलेंडरवर पंतप्रधान मोदी यांचे फोटो लावलेले दिसत आहेत. यावर  'मोदीजी - - रु 1105' असा संदेश असलेली पोस्टर्स पंतप्रधानांच्या हसतमुख प्रतिमेसह लावण्यात आली आहेत. 






नुकतंच झहीराबाद मतदारसंघाच्या दौऱ्यावर आलेल्या अर्थमंत्री सीतारमण यांनी रेशन दुकानांवर पीएम मोदींच्या चित्रांची गरज असल्याचे सांगितले होते. अनुदानित तांदूळ पुरवल्या जाणाऱ्या तांदळाचा मोठा वाटा केंद्र सरकार उचलत आहे, असं सांगत त्यांनी ही इच्छा दर्शवली होती. त्यानंतर टीआरएसने पंतप्रधानांचे फोटो सिलेंडरवर लावत निशाणा साधला आहे. 






टीआरएसचे सोशल मीडिया संयोजक कृशांक मन्ने यांनी ट्विटरवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यावर 'सीतारामन जी, तुम्हाला मोदीजींचे फोटो हवे होते. हे घ्या फोटो' असा संदेश लिहिण्यात आला आहे. कृशांकने यांनी केलेलं हे ट्वीट बऱ्यापैकी व्हायरल झालं आहे. तेलंगणा सरकारमधील काही मंत्र्यांनी देखील हे ट्वीट री ट्वीट केलं आहे.  


तेलंगणामधील काही विधानसभा पोटनिवडणुकांमध्ये केसीआर यांच्यासह टीआरएसचे नेते सामान्यत: जनतेला महागाईची आठवण करुन देत आहेत. यामध्ये सामान्यांशी संबंधित मुद्द्यांवर जोर दिला जात आहे.  सध्या गगणाला भिडलेल्या सिलेंडरच्या किमतीवरुन टीआरएस आक्रमक होत असल्याचं चित्र आहे.