नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट गडद होत असताना दिल्लीतलं शेतकरी आंदोलन नेमकं कसं सुरु आहे. शेतकरी अजूनही रस्त्यावर आंदोलन करत ठाण मांडून आहेत का असे अनेक प्रश्न विचारले जातायत...तर कोरोनाच्या सावटात हे शेतकरी आंदोलन कसं सुरु आहे, याबाबत जाणून घेऊयात...
दिवस 142..हिवाळा संपला..उन्हाळा सुरु झाला.कोरोनाची पहिली लाट गेली. आता दुसरी आली..पण दिल्लीतलं शेतकरी आंदोलन अजूनही सुरुच आहे. गाझीपूर सीमेवर जवळपास दोन किलोमीटर लांबवर हे तंबू अजूनही आपले आंदोलनाचे झेंडे फडकावत उभेच आहेत.शेतकऱ्यांची संख्या थोडीशी कमी असली तरी तंबू मात्र हटलेले नाहीत.लंगरही उभेच आहेत. जोपर्यंत सरकार मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत हटणार नाही असा त्यांचा निर्धार कायम आहे.
महाराष्ट्राप्रमाणेच सध्या कोरोनाची लाट दिल्लीतही वेगानं धडकलीय. काल दिल्लीत एका दिवसात 19 हजार नवे रुग्ण सापडलेत. दिल्लीत वीकएन्ड लॉकडाऊन लावला गेलाय.पण या सगळ्या सावटातही आंदोलन सुरु आहे. 26 जानेवारीच्या हिंसाचारानंतर आंदोलन संपतंय की काय अशी चर्चा सुरु झाली होती.पण टिकैत यांच्या नेतृत्वानं पुन्हा आंदोलनाला बळ दिलं.
आंदोलनात सध्या कुठला मोठा कार्यक्रम जाहीर झालेला नाहीय. 11 एप्रिलला दिल्लीतला कुंडल मानेसर हायवे एका दिवसासाठी आंदोलकांनी रोखून धरला. पण सध्या बंगालच्या निवडणुका, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर यात आंदोलन जितकं चर्चेत यायला हवं तितकं येत नाहीय.
चर्चेसाठी तयार असं सरकारही म्हणतंय,आंदोलकही म्हणतायत.पण ही चर्चा सुरु कुणी करायची हा प्रश्न आहे.सुप्रीम कोर्टानं नेमलेल्या मध्यस्थ समितीवर आंदोलकांनी बहिष्कार टाकला...या समितीनं आपला अहवाल कोर्टाला सादर केलाय...त्यावरही सुनावणी लवकरच अपेक्षित आहे.त्यामुळे आता पुन्हा कोर्ट आंदोलनाबाबत काही निर्णय देतंय का पाहावं लागेल...दुसरीकडे शाहीनबागचं आंदोलन कोरोनाचं निमित्त करुन संपवलं तसं आता दुसऱ्या लाटेचं निमित्त करुन सरकार शेतकरी आंदोलन दडपणार का हेही पाहावं लागेल.