भोपाळ: नवी दिल्लीतील निर्भया आणि मुंबईतील शक्ती मिल गँगरेपनंतर मध्य प्रदेशातील भोपाळमध्येही थरकाप उडवणारी गँगरेपची घटना घडली आहे.


चार नराधमांनी चक्क पोलिसाच्या 19 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे नराधमांनी परिसीमा गाठत, चहा, गुटखा, सिगरेटसाठी ब्रेक घेऊन, पीडितेवर तीन तास अत्याचार केला.

त्याहूनही धक्कादायक म्हणजे पीडित तरुणी कशीबशी पोलीस स्टेशनला पोहोचली, मात्र इथेही पोलिसांनी तिला हद्दीवादावरुन नागवलं. तीन पोलीस स्थानकांनी हा भाग आमच्या हद्दीत नसल्याचं कारण देत, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली.

महत्त्वाचं म्हणजे पीडित तरुणीचे वडील पोलीस उपनिरीक्षक (PSI) तर आई गुन्हे अन्वेषण विभागात (CID) आहे.

क्लासवरुन येताना अत्याचार

पीडित 19 वर्षीय कॉलेज विद्यार्थीनी ही कोचिंग क्लासवरुन परतत होती. त्यावेळी चार नराधमांनी तिचं अपहरण करुन तिला रेल्वे ट्रॅकजवळ निर्जन स्थळी नेलं. तिथे एका ब्रिजखाली तिच्यावर अत्याचार केले.

हा भाग भोपाळमधील हबीबगंज स्टेशनच्या जवळच आहे.

पीडित तरुणी ही पदवीचं शिक्षण घेत असून, स्पर्धा परीक्षेची तयारी करते.

या अत्याचारानंतर पीडित तरुणी कशीतरी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. मात्र एमपी नगर आणि हबीबजंग पोलिसांनी हद्दीच्या वादावरुन गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ केली. त्यापुढचा कहर म्हणजे पोलिसांनी तरुणीला फिल्मी स्टोरी सांगत असल्याचा टोमणा मारला.

अखेर रेल्वे पोलिसांनीच पुढाकार घेत गुन्हा दाखल केला.

गोलू चाधर, अमर, राजेश आणि रमेश अशी या नराधमांची नावं आहेत. या चारही आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. धक्कादायक म्हणजे गोलू हा स्त्रीभ्रूण हत्येतीतीलही आरोपी असून सध्या तो जामीनावर बाहेर आहे.

या नराधमांनी अत्याचारादरम्यान चहा-गुटख्यासाठी ब्रेक घेऊन, पुन्हा पाशवी कृत्य केलं.

मंगळवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. मात्र पीडित कुटुंबाला गुन्हा दाखल करण्यासाठी बुधवारी दिवसभर चकरा माराव्या लागल्या.

पीडित कुटुंबाने पोलीस उपमहानिरीक्षकांशी संपर्क साधून लक्ष घालण्याची विनंती केली. त्यानंतर उपमहानिरीक्षकांनी संबंधित पोलीसंना चौकशीचे आदेश देत, दुर्लक्ष करणाऱ्या पोलिसांवर निष्काळजीपणाचा ठपका ठेवला.