गणपती बाप्पाच्या आगमणाच्या या पावन पर्वावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी गणेश चतुर्थीच्या या पर्वात कोरोनाचं संकट संपावं अशी कामना केली आहे. ते म्हणतात, "गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर सर्व देशवासियांना हार्दिक शुभेच्छा. हे पर्व भारतातील लोकांच्या अदम्य उत्साह, उमंग आणि उल्हासाचे प्रतिक आहे. माझी प्रार्थना आहे की, विघ्नहर्ता श्री गणेशजीच्या कृपेने कोविड-19 ची महामारी संपावी आणि सर्व देशवासियांना सुखी आणि निरोगी जीवन मिळावं".
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, "तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया ! तुमच्यावर गणेशाची कृपा कायम राहो. सर्वत्र आनंद आणि भरभराट होवो".
केंद्रीयमंत्री अमित शाह यांनी सर्व देशवासियांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे, मंगलकर्ता-विघ्नहर्ता आपल्या आशीर्वादाची आज संपूर्ण देशाला गरज आहे. सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे, 'महाराष्ट्रातील तमाम जनतेला श्री गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!. गणपती बाप्पा मोरया!. गणेशाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षी प्रमाणे यंदाही करतो आहोत, मात्र यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकरात लवकर मुक्ती मिळावी. तसेच या साथीचा मुकाबला करण्यासाठी कोविड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना शक्ती मिळो अशी प्रार्थना'.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ट्वीट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटलं आहे की, “मनाला प्रसन्न करणारे श्रीगणेशाचे सर्वव्यापक आणि सर्वस्पर्शी रूप हे मानवासाठी सौख्याचे अधिष्ठान आहे. सकलांना मार्ग दाखवणारा अधिनायक, विघ्नहर्त्या गजाननाने जगावरील कोरोनारूपी संकटाचा नाश करून सर्वांचे मंगल करावे,ही श्रींचरणी प्रार्थना. सर्वांना श्रीगणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा!,”