Gandhinagar Railway Station : गुजरातच्या गांधीनगरमध्ये पुनर्विकसित केलेल्या रेल्वेस्टेशनसह अन्य काही विकासकामांचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते व्हर्चुअली व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून होणार आहे. मोदींच्या हस्ते गुजरातमध्ये रेल्वेच्या काही महत्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन होईल तसंच ‘अॅक्वाटिक्स अॅन्ड रोबॉटिक्स गॅलरी’ आणि गुजरात सायंस सिटीमधील ‘नेचर पार्क’ देखील लोकार्पित केलं जाणार आहे.
पंतप्रधान मोदी आज पुनर्विकसित गांधीनगर रेल्वे स्टेशन आणि रेल्वे स्टेशनच्या वर बनवलेल्या फाईव्ह स्टार हॉटेलचं व्हर्चुअली उद्घाटन करतील. तसेच पंतप्रधान मोदी गांधीनगर राजधानी-वाराणसी सुपरफास्ट एक्सप्रेस आणि गांधीनगर राजधानी- वरेठा दरम्यान एमईएमयू या दोन नवीन ट्रेन्सला हिरवा झेंडा देखील दाखवतील.
पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार गांधीनगर राजधानी रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी 71 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. आधुनिक सुविधांसह एअरपोर्टसारख्या सुविधा या रेल्वे स्टेशनवर पुरवण्यात येणार आहेत.
गांधीनगर कॅपिटल पहिला स्टेशन आहे जिथं स्टेशनवर फाईव्ह स्टार हॉटेलची निर्मिती करण्यात आली आहे. स्टेशनवर आल्यानंतर प्रवाशांना विमानतळावर आल्याचीच भावना निर्माण होईल अशी याची निर्मिती केली आहे. पंतप्रधान मोदींचा हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातो.
गांधीनगर राजधानी रेल्वे स्टेशनमधील विशेष गोष्टी
- दिव्यांग व्यक्तिंसाठी एक विशेष तिकिट खिडकी, रॅम्प, सुरक्षित पार्किंग व्यवस्था
- संपूर्ण इमारतीला हरित भवनच्या स्वरुपात डिझाईन केलं आहे.
- स्टेशनवर अत्याधुनिक थीमवर आधारित लायटिंगची व्यवस्था केली आहे. ज्यात 32 थीम आहेत.
- स्टेशन परिसरात फाईव्ह स्टार हॉटेलची निर्मिती करण्यात आली आहे. या हॉटेलमध्ये 318 खोल्या आहेत.
- अत्याधुनिक अॅक्वाटिक गॅलरीच्या टॅंकमध्ये जगभरातील विविध प्रजातींचे जलचर प्राणी असतील.
- गांधीनगर कॅपिटल रेल्वे स्टेशन आणि हॉटेलमध्ये सामाजिक तसेच पारिवारिक समारंभांच्या आयोजनासाठी वातानुकूलित हॉल आणि 1100 मीटर ओपन स्पेस ठेवण्यात आला आहे.
- स्टेशनवर तीन प्लॅटफार्म, दोन एस्कलेटर्स, तीन एलिव्हेटर व दोन प्रवाशी सबवे बनवण्यात आले आहेत.
- सोबतच आठ आर्ट गॅलरी आहेत ज्यामध्ये गुजरातच्या ऐतिहासिक स्थळांची आणि लोककलांची माहिती देणारं प्रदर्शन असेल.