नवी दिल्ली जी-20 शिखर परिषदेसाठी (G20 Summit) राजधानी दिल्ली (Delhi) सज्ज झाली आहे. संपूर्ण दिल्लीमध्ये सध्या जी-20 शिखर परिषदेचा उत्साह पाहायला मिळतोय.  अशा परिस्थितीत बैठकीला येणाऱ्या देशांच्या प्रमुख पाहुण्यांचा मुक्काम कोणत्या हॉटेलमध्ये असणार, त्यांच्या स्वागतासाठी काय व्यवस्था आहे, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे. दरम्यान, हॉटेलमधील त्यांच्या खोल्यांची व्यवस्था कशी असेल? त्यांना कोणत्या सुविधा उपलब्ध होतील? हा सध्या प्रत्येकाच्या कुतुहलाचा विषय बनला आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या पाहुण्यांसाठीच्या जेवणाचा बेत काय असणार? हा प्रश्न देखील सध्या अनेकांना पडलाय. 


हॉटेल द ललितमध्ये राहणार जपान आणि कॅनडाचे शिष्टमंडळ


दिल्लीच्या मध्यभागी असलेले हॉटेल द ललित हे आपल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी उत्सुक आहे. हॉटेलमध्ये परदेशी पाहुण्यांच्या स्वागतासाठी विशेष तयारी करण्यात आलीये.  जपान आणि कॅनडातील शिष्टमंडळे या हॉटेलमध्ये राहणार आहेत. परदेशी पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी हॉटेलने आपल्या कर्मचार्‍यांमध्ये विविध श्रेणीतील खास  लोकांची निवड केली आहे. पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी आणि देशातील विविधतेचे प्रदर्शन करण्यासाठी LGBTQI आणि दिव्यांगजन गटातील एक व्यक्ती या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज असेल. हे लोक पाहुण्यांचे सांकेतिक भाषेमध्ये स्वागत करणार आहेत. 


लिव्हिंग रूममध्ये  हॉटेलच्या Legacy Suites खोल्यांमध्ये  कॅनडा आणि जपानचे राष्ट्रप्रमुख राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तसेच इथे एक जेवणाची खोली सुंदर डायनिंग टेबलने सजवण्यात आलीये.  पाहुण्यांना थेट त्यांच्या मास्टर बेडरूमच्या खिडकीतून कॅनॉट प्लेस आणि भारत मंडप पाहू शकणार आहेत.  या सर्वांशिवाय गेस्ट रूममध्ये लावलेल्या सर्व काचा या बुलेट प्रूफ आहेत. जेवणामध्ये देखील भारताची विविधता परदेशी पाहुण्यांना चाखालया मिळणार आहे.


स्वागताची विशेष तयारी


ही विशेष तयारी केवळ हॉटेल ललितमध्येच नाही, तर जी-20 शिखर परिषदेसाठी बुक केलेल्या सर्व हॉटेल्समध्येही करण्यात आली आहे. दिल्लीतील हॉटेल ताज पॅलेस देखील आपल्या पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहे. या हॉटेलमध्ये स्वागतासाठी  खास ढोल-ताशांची व्यवस्था करण्यात आली असून पाहुण्यांचे राजेशाही थाटात स्वागत करण्यात येणार आहे. ताज पॅलेसमध्ये जेवणाचीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.  यामध्ये अनेक पारंपारिक पदार्थांचा बेत आखण्यात आला आहे. दरम्यान या पाहुण्यांना भारताच्या स्ट्रिट फूडची देखील मेजवानी चाखायला मिळणार आहे.


राजधानी दिल्लीमध्ये 9 आणि 10 सप्टेंबर रोजी जी-20 शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेसाठी अनेक देशांचे प्रतिनिधी भारतात येणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी भारत सज्ज झाला असून त्या अनुषंगाने तयारी देखील करण्यात आली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


G20 Summit in Delhi: भारतात होणाऱ्या जी-20 परिषदेकडे चीनची पाठ? राष्ट्रपती शी जिनपिंग अनुपस्थित राहणार असल्याचा दावा