G20 Minister Meets At Kashi : उत्तर प्रदेशच्या वाराणसी येथे आज जी-20 (G-20) देशांच्या विकास मंत्र्यांची बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे या बैठकीला संबोधित केलं आणि सर्व प्रतिनिधींचं स्वागतही केलं. यावेळी मोदींनी सांगितले की, "मी मदर ऑफ डेमोक्रेसीच्या सर्वात जुन्या जिवंत शहरात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. जी-20 च्या विकासाचा अजेंडा काशीपर्यंत (G20 Minister Meets At Kashi) पोहोचला, याचा मला आनंद आहे." ते पुढे म्हणाले की, "ग्लोबल साऊथसाठी विकास हा प्रमुख मुद्दा आहे. विकासाची उद्दिष्टे मागे पडू न देणे, ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. यामध्ये कुणीही मागे पडणार नाही, हे आपल्याला ठरवावं लागेल. जागतिक कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या समस्येचा ग्लोबल साउथच्या देशांवर गंभीर परिणाम झाला. तसेच भू-राजकीय तणावामुळे अन्न, इंधन आणि खतांच्या संकटामुळे आणखी फटका बसला आहे. या परिस्थितीमध्ये तुम्ही घेतलेल्या निर्णयाचं खूप महत्त्व आहे." 


काशी हे शतकानुशतके ज्ञानाचं केंद्र - पंतप्रधान मोदी


पंतप्रधान मोदींनी सांगितले की, "काशी हे शतकानुशतके ज्ञान, चर्चा, संस्कृती आणि अध्यात्माचं केंद्र राहिलं आहे. यामध्ये भारताच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक वारशाचा सार आहे. हे शहर देशातील सर्व भागांतील लोकांसाठी एकमेकांमध्ये सामावून घेण्याचं काम करतं. भारतामध्ये डिजिटलायझेशनमुळे क्रांतिकारी बदल घडून आले आहेत. भारत आपले अनुभव सहभागी देशांसोबत शेअर करण्यासाठी उत्सुक आहे."


यावेळी भारतातील स्त्री शक्तीचा उल्लेख करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, "भारतामध्ये आपण महिला सक्षमीकरणापर्यंतच मर्यादित नाही, तर महिला विकासाचं नेतृत्व करत आहोत. तसेच महिला विकासाचा अजेंडा ठरवत आहेत आणि त्या बदलांच्या साक्षीदार देखील आहेत." ते पुढे म्हणाले की, "मी तुम्हाला महिलांचं नेतृत्व असणाऱ्या विकासासाठी गेम चेंजिंग अॅक्शन प्लॅन स्वीकारण्याचं आवाहन करत आहे." 


इतर बातम्या वाचा :


 Pune News : जनभागीदारी कार्यक्रमातून देशभरातील शाळांमध्ये G-20, नवीन शैक्षणिक धोरणबाबत केली जाणार जागृती