नवी दिल्ली/ मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयाची घोषणा करुन आज 18 दिवस झाले आहेत. या 18 दिवसांच्या कालावधीत देशाच्या विविध भागातून 500 आणि 1000 रुपयांची 300 कोटींंची काळीमाया जप्त केली आहे.
24 तासात दोन विमानतळांवरुन 8 कोटी जप्त
नोटाबंदीच्या निर्णयाचा आज 18 वा दिवस असला, तरी गेल्या 24 तासात दिल्ली आणि मुंबई या दोन्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांवरुन तब्बल 8 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. यामध्ये मुंबई विमानतळावरुन तब्बल 5 कोटी रुपये, तर दिल्ली विमानतळावरुन 3 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.
पुण्यातून 1 कोटी जप्त
या निर्णयामुळे बिल्डर लॉबीचे धाबे चांगलेच दणाणले असून, पुण्यातील बांधकामाचे साहित्य पुरवणाऱ्या भारत शाह याच्याकडून 1 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. याशिवाय पुणे गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत अनेक ठिकाणांहून लाखो रुपये जप्त करण्यात आले आहेत.
नागपूरमधून जुन्या नोटांसोबत नोटा मोजणारे मशीन जप्त
नागपूरमधूनही 500 आणि 1000 रुपयांच्या 1 कोटी रुपयांच्या नोटासोबतच नोटांची मोजणी करणारे मशीन जप्त करण्यात आले आहे.
छत्तीसगडच्या कोंडगावमधून 44 लाख जप्त
छत्तीसगडमधील कोंडगावमधून 44 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. नोटाबंदीच्या निर्णयानंतर एक व्यक्ती संशयास्पद पैसे घेऊन जात असताना आढळल्याने पोलिसांनी त्याला अटक केली.
2000च्या नव्या नोटांचीही ब्लॅकमनी जप्त
विशेष म्हणजे, देशाच्या विविध भागांतूनही करण्यात आलेल्या कारवाईत कोट्यवधी रुपये जप्त करण्यात आले आहेत. दिल्ली पोलिसांनी 27 लाखांच्या नव्या 2000 रुपयांच्या नोटांची ब्लॅकमनी जप्त केली आहे. ही रक्कम हजरत निजामुद्दीन रेल्वे स्थानकाजवळून एका फॉर्च्यूनर गाडीतून जप्त करण्यात आली. या सर्व नोटा मुंबईमध्ये बदलून दिल्लीत आणल्या गेल्याचे सांगण्यात येत आहे.
नाकाबंदी दरम्यान जुन्या नोटा जप्त
नाकाबंदी दरम्यान हरियाणा पोलिसांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी घेऊन जात असताना जप्त केल्या आहेत. ही रक्कम जवळपास 2 कोटी असल्याचे सांगण्यात येत आहे.
पूर्वोत्तर राज्यांमधूनही जुन्या नोटा जप्त
पूर्वोत्तर राज्य मणिपूरमधूनही 500 आणि 1000 रुपयांच्य जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. मणिपूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 44 लाख रुपयांचे काळेधन जप्त करण्यात आले आहे.
18 दिवसात 300 कोटी जप्त
अशाप्रकारे देशाच्या विविध भागामधून गेल्या 18 दिवसांत 300 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. त्यामुळे नोटाबंदीच्या निर्णयाची ब्लॅकमनी धारकांना धडकी भरली आहे. दरम्यान, विमानतळ आणि रेल्वे स्थानकांवरील पोलिसांना 24 तास सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.