मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे देशातील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांना अर्थिक टंचाईचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत महागाईदेखील वाढली आहे. बर्‍याच कंपन्यांनी इलेक्ट्रॉनिक वस्तू, स्मार्ट फोन आदींच्या किंमती वाढवल्या आहेत. यावर्षी या वस्तूंच्या किंमती तीनदा वाढल्या आहेत. गेल्या आठवड्यात मारुती सुझुकी, हीरो मोटर कॉर्प, इलेक्ट्रॉनिक उत्पादन कंपन्या, सोनी, एलजी आणि गोदरेज यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किंमती वाढवल्या. याशिवाय शाओमी, रियलमी आणि व्हिवो यांनी आपापल्या स्मार्टफोनच्या किंमती वाढवण्याची देखील घोषणा केली. वस्तूंच्या वाढीव किंमतीमुळे कंपन्यांना भीती आहे की यामुळे मागणी कमी होणार नाही.


कच्च्या मालाच्या किंमतींमुळे वस्तूंच्या किंमती वाढल्या


रिपोर्ट्सनुसार बाजारात कच्च्या मालाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे नियमित वापरल्या जाणाऱ्या वस्तूंच्या किंमतीत वाढ होत आहे. स्टील, अ‍ॅल्युमिनियम, रबर, तांबे, प्लास्टिक आणि इतर कच्च्या मालाच्या किंमती वाढल्या आहेत. मोठ्या एफएमसीजी कंपन्यांचे म्हणणे आहे की जर वस्तू, पॅकेजिंग आणि लॉजिस्टिकचा खर्च जास्त करावा लागला तर त्याचा थेट परिणाम रोजच्या जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीवर होईल. कोविडच्या दुसऱ्या लाटेनंतर काही महिन्यांनंतर बाजार जूनमध्ये किंचित स्वरुपात पुन्हा सुरु झाला. परंतु जर वस्तूंची किंमत वाढली आणि त्यांचे दर आणखी वाढते, ज्याचा थेट मागणीवर परिणाम होईल. यामुळे विक्री कमी होईल, ज्यामुळे कंपन्यांना तोटा सहन करावा लागू शकतो.


गेल्या सहा महिन्यांत किंमत 3 ते 5 टक्क्यांनी वाढल्या


गेल्या सहा महिन्यांत बर्‍याच कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किंमतीत 3 ते 3 टक्क्यांनी वाढ केली आहे. भारतातील सर्वात मोठी कार निर्माता मारुती सुझुकीने सांगितलं की, अत्यावश्यक कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे कारची किंमत वाढवणे आवश्यक होते. इतर कंपन्यांचंही जवळपास हेच म्हणणं आहे. 


पु्न्हा किमती वाढण्याची शक्यता


कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाल्याने घरातील सामान खरेदी 1 जुलैपासून सर्वसामान्यांसाठी महाग होईल. कारण एसी, टीव्ही, फ्रीझसह इतर उत्पादने बनवणार्‍या कंपन्यांनी त्यांच्या उत्पादनांच्या किंमती वाढवण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या किंमतीत सुमारे 3-4 टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे. गेल्यावर्षी याच काळाच्या तुलनेत एप्रिल ते मे 2021 या कालावधीत घरगुती उपकरणांच्या विक्रीत 20 टक्क्यांनी घट झाली आहे. एका अहवालानुसार, होम अप्लायंसेस क्षेत्रातील आघाडीची कंपनी बजाज इलेक्ट्रॉनिक जुलै ते ऑगस्ट दरम्यान आपल्या सर्व उत्पादनांच्या किंमती कमीतकमी 3 टक्क्यांनी वाढवण्याची तयारी करत आहे. त्याचप्रमाणे गोदरेज अप्लायन्सेससुद्धा उत्पादनांच्या किंमती दुसऱ्या तिमाहीत दोनदा 7-8 टक्क्यांनी वाढवू शकतात. तांबे, स्टीलसह इतर धातूंच्या किंमती वाढल्यामुळे घरगुती वस्तूंच्या किंमती वाढल्या असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
 
टीव्हीच्या किंमतीही वाढू शकतात


एसी निर्माता ब्लू स्टार देखील 1 सप्टेंबरपासून आपल्या उत्पादनाच्या किंमतीत 5 ते 8  टक्क्यांनी वाढ करण्याची तयारी करत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्पादन तयार करण्यासाठी सुमारे 25 टक्के अधिक खर्च करावा लागणार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. एलईडी पॅनेल्स आणि सेमी कंडक्टरच्या कमतरतेमुळे टीव्हीच्या किंमतीही वाढू शकतात. सोनी त्यांच्या टीव्हीची किंमत 12-15 टक्क्यांनी वाढवण्याची शक्यता आहे.