Chandipura Virus: कोरोनानंतर झिका आणि आता चांदीपुरा व्हायरसमुळे चिंता वाढली आहे. गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यात चांदीपुरा विषाणूच्या(Chandipura Virus) संशयास्पद संसर्गामुळे चार मुलांचा मृत्यू झाला आहे, तर दोन मुलांवर उपचार सुरू आहेत. याबाबत माहिती देताना एका अधिकाऱ्याने आज (शनिवारी) सांगितले की, विषाणूची लागण झालेल्या दोन्ही मुलांवर हिम्मतनगरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


या चांदीपुरा व्हायरसबाबत आधिक माहिती देताना अधिकाऱ्याने सांगितले की, चांदीपुरा विषाणूने(Chandipura Virus) ग्रस्त व्यक्तीला ताप येतो आणि त्याची लक्षणे फ्लू आणि तीव्र एन्सेफलायटीस सारखी असतात. हे डास, रक्त शोषणारे कीटक यांसारख्या किटकांपासून पसरते. हा रोगजनक विषाणू Rhabdoviridae मधील वेसिक्युलोव्हायरस वंशाचा आहे.


याबाबत माहिती देताना साबरकांठाचे मुख्य जिल्हा आरोग्य अधिकारी राज सुतारिया यांनी सांगितले की, सहाही बालकांचे रक्ताचे नमुने पुष्टीकरिता पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेकडे (Pune NIV) पाठविण्यात आले असून या चाचणीच्या निकालाची प्रतीक्षा आहे. ते म्हणाले की, हिम्मतनगर सिव्हिल हॉस्पिटलमधील बालरोगतज्ञांनी 10 जुलै रोजी तेथे चार मुलांचा मृत्यू झाल्यानंतर चांदीपुरा विषाणूचा (Chandipura Virus) संशय व्यक्त केला होता. त्यानंतर मुलांचे नमुने पुण्याला तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.


सुतारिया म्हणाले की, रुग्णालयात दाखल असलेल्या इतर दोन मुलांमध्येही अशीच लक्षणे दिसून आली आहेत. त्यांनाही याच विषाणूची लागण झाल्याचे दिसते. आतापर्यंत मृत्युमुखी पडलेल्या चार मुलांपैकी एक साबरकांठा जिल्ह्यातील आणि दोन शेजारील अरवली जिल्ह्यातील, तर चौथे मूल राजस्थानमधील आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेली आणखी दोन मुलेही राजस्थानमधील असल्याचे त्यांनी सांगितले.


सुतारिया पुढे माहिती देताना म्हणाले की, राजस्थानच्या अधिकाऱ्यांना संशयास्पद विषाणू संसर्गामुळे मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. 'आम्ही मृत्यू झालेल्या चौघांसह सहाही मुलांचे रक्ताचे नमुने पुण्यातील एनआयव्हीकडे पाठवले आहेत.या नमुन्याची प्रतीक्षा आहे'.


संसर्ग रोखण्यासाठी, जिल्हा अधिकाऱ्यांनी बाधित भागात उपाययोजना करण्यासाठी पथके तैनात केली आहेत, अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी दिली आहे.