नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसचे माजी नेते आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे निकटवर्तीय मुकुल रॉय यांनी आज अखेर भाजपत प्रवेश केला. केंद्रीय न्यायमंत्री रवीशंकर प्रसाद आणि भाजपचे वरिष्ठ नेते कैलास विजयवर्गीय यांच्या उपस्थितीत मुकुल रॉय यांनी भाजपत प्रवेश केला.

यावेळी रॉय यांनी भाजप हा पक्ष धर्मनिरपेक्ष असल्याचं सांगितलं.

भाजप प्रवेशानंतर मुकुल रॉय म्हणाले कि, “भाजपच्या समर्थनाशिवाय तृणमूल काँग्रेसला पश्चिम बंगालमध्ये सत्तास्थापन करता येणार नाही. 1998 आणि 1999 मध्ये भाजपशी हात मिळवणी केल्यानं तृणमूल काँग्रेसला सत्तेत वाटा मिळाला. भाजप हा पक्ष खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष पक्ष आहे.”

यावेळी रवीशंकर प्रसाद यांनी मुकुल रॉय यांच्या कामाचं कौतुक केलं. “पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट पक्षाची सत्ता उखडून टाकण्यात मुकुल रॉय यांनी महत्त्वाची भूमिका निभावली. कम्युनिस्टांचा दहशतवादाशी त्यांनी मोठ्या ताकदीनं लढा दिला.”

मुकुल रॉय यांनी ममता बॅनर्जींसोबत तृणमूल काँग्रेसची स्थापना केली होती. यूपीए सरकारच्या कार्यकाळात ते केंद्रीय मंत्री, तसेच राज्यसभा सदस्य देखील होते. त्यांच्या भाजप प्रवेशाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होती. गेल्याच महिन्यात त्यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामाही दिला होता.