Parkash Singh Badal Death: पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते प्रकाशसिंग बादल यांचे आज निधन झाले. ते 95 वर्षांचे होते. प्रकाशसिंग बादल हे मागील काही दिवसांपासून  रुग्णालयात दाखल होते. बादल यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना सोमवारी अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. बुधवारी सकाली मोहाली ते भटिंडातील बादल यांच्या मूळ गावापर्यंत अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे. 


प्रकाश सिंह बादल यांना आठवडाभरापूर्वी श्वास घेण्यास त्रास होत होता. त्यानंतर त्यांना उपचारासाठी मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 


शिरोमणी अकाली दलाचे ज्येष्ठ नेते प्रकाशसिंग बादल हे पाच वेळा पंजाबचे मुख्यमंत्री होते. शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर बादल हे त्यांचे पुत्र आहेत. प्रकाशसिंग बादल यांचा जन्म 8 डिसेंबर 1927 रोजी पंजाबमधील अबुल खुराना या छोट्याशा गावात जाट शीख कुटुंबात झाला. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त 


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बादल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. प्रकाश सिंह बादल यांच्या निधनाने अत्यंत दु:ख झाले असल्याचे त्यांनी म्हटले. भारतीय राजकारणातील ते एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व होते. बादल यांनी आपल्या देशासाठी मोठे योगदान दिले. पंजाबच्या प्रगतीसाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले आणि कठीण प्रसंगी राज्याचे नेतृत्व केले असल्याचे त्यांनी सांगितले. 






लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनीदेखील दु:ख व्यक्त केले. प्रकाश सिंह बादल यांनी सामान्य जनता आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचे योगदान दिले. लोकशाही मूल्ये दृढ करण्यात त्यांचा वाटा होता, असेही बिर्ला यांनी म्हटले. त्यांच्या निधनाने भारतीय राजकारणातील एका युगाचा अंत झाला आहे. 


काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीदेखील बादल यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. प्रकाश सिंह  बादल हे भारतीय राजकारणातील दिग्गज व्यक्तीमत्त्व होते. साधी राहणी, कार्यकर्त्यांवरील प्रेम यांच्यामुळे ते लोकप्रिय होते. त्यांनी पंजाबचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते, असे खर्गे यांनी म्हटले.