अजातशत्रू, हळव्या मनाचा कवी, अभ्यासू पत्रकार, दिलदार आणि जिंदादिल राजकारणी असलेल्या वाजपेयींना निरोप देण्यासाठी देशा-विदेशातील मान्यवरांची पावलं, स्मृतीस्थळाकडे वळली.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, भाजपाध्यक्ष अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह दिग्गज नेते अंत्यविधीला उपस्थित होते.
दुसरीकडे भूतानचे राजा वांगचूक, अफगाणिस्तानचे माजी राष्ट्रपती हमीद करझई यांनीदेखील वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली.
वाजपेयींना अखेरचा निरोप देताना मोदी, अडवाणी, लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांना अक्षरश: अश्रू अनावर झाले.
LIVE UPDATE
4.55 PM मानसकन्या नमिता भट्टाचार्यने वाजपेयींच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला.
3.55 PM अटल बिहारी वाजपेयी यांचं पार्थिव स्मृतीस्थळी दाखल
2.30 PM - अटल बिहारी वाजपेयींच्या अंत्ययात्रेत मोठी गर्दी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अंत्ययात्रेत सहभागी
2.00 PM अलोट गर्दीत वाजपेयींचा अखेरचा प्रवास सुरु, भाजप मुख्यालयातून अंत्ययात्रेला सुरुवात
12.30 PM : अभिनेत्री हेमा मालिनी यांच्याकडून अटलजींच्या पार्थिवाचं दर्शन
12.05 PM : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी आणि पुत्र आदित्य यांच्यासह वाजपेयींच्या अंत्यदर्शनासाठी भाजप मुख्यालयात
12.05 PM : भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी वाजपेयींच्या अंत्यदर्शनाला
11.35 AM : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वाजपेयींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
11.10 AM : केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस राम माधव, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल राम नाईक वाजपेयींच्या अंत्यदर्शनाला
11.05 AM : भाजपाध्यक्ष अमित शाह, गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून वाजपेयींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
11.05 AM : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अटल बिहारी वाजपेयींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
10.55 AM : अटल बिहारी वाजपेयी यांचं पार्थिव भाजप मुख्यालयात दाखल, पंतप्रधान मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासह भाजपचे अनेक दिग्गज नेते उपस्थित
10.25 AM : अटल बिहारी वाजपेयी यांचं पार्थिव भाजप मुख्यालयाच्या दिशेने रवाना, मार्गात समर्थकांची गर्दी
10.00 AM : अटल बिहारी वाजपेयी यांचं पार्थिव भाजप मुख्यालयाच्या दिशेने रवाना
08.55 AM: आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू वाजपेयींच्या अंत्यदर्शनाला
08.45 AM: काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडून वाजपेयींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
08.35 AM: राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोभाल यांच्याकडून वाजपेयींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन
08.15 AM: वाजपेयींच्या अंत्यदर्शनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी थोड्याच वेळात भाजप मुख्यालयात जाणार
08. 00 AM : सरसंघचालक मोहन भागवत अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्यदर्शनासाठी निवासस्थानी.
07.40 AM: भाजपाध्यक्ष अमित शाह पुन्हा अटल बिहारी वाजपेयी यांच्या निवासस्थानी. गीतकार जावेद अख्तर, अभिनेत्री शबाना आझमीही पार्थिवाच्या अंत्यदर्शनाला
06.15 AM: अटलजींच्या अंत्ययात्रेसाठी निवासस्थानाबाहेर फुलांनी सजवलेला रथ सज्ज करण्यात आला.
66 दिवसांपासून रुग्णालयात
अटल बिहारी वाजपेयी यांना 11 जून 2018 रोजी उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. किडनीच्या आजारामुळे त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आलं होतं. वाजपेयी 2009 सालापासूनच आजारी होते. त्यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हिलचेअरचा वापर करावा लागत असे. अटल बिहारी वाजपेयी हे डिमेंशिया आजाराने त्रस्त होते.
जिंदादिल राजकारणी
माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी हे देशाच्या पंतप्रधानपदी तीनवेळा विराजमान झालेच, मात्र एक जिंदादिल राजकारणी म्हणूनही त्यांचं व्यक्तिमत्त्व कायम जनतेसमोर आलं. वाजपेयींच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू होते. हळूवार मनाचा कवी, सेवाभावी माणूस, सौम्य हिंदुत्त्व अशा अनेक गोष्टींनी त्यांचं आयुष्य व्यापलं होतं. अटल बिहारी वाजपेयी मोठ्या कालावधीपासून राजकीय जीवनापासून दूर होते.
तीन वेळा पंतप्रधान
अटल बिहारी वाजपेयी तीनवेळा भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. पहिल्यांदा 1996 मध्ये ते पंतप्रधान झाले. मग 1998 आणि 1999 ते 2004 या काळात त्यांनी पंतप्रधानपद भूषवलं.
पत्रकार, राजकारणी, कवी, लेखक
वाजपेयी हे केवळ राजकारणी नव्हते, तर त्यांची पत्रकार, कवी, लेखक अशीही ओळख होती. राजकारणात येण्यापूर्वी ते पत्रकार होते. काश्मीरमध्ये परमिट सिस्टम लागू करण्यात आलं होतं, तेव्हा डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींसोबत पत्रकार म्हणून वाजपेयी काश्मीरला गेले होते. श्यामा प्रसाद मुखर्जी यांचा नजरकैदेत असताना मृत्यू झाला. त्यानंतर अटल बिहारी वाजपेयी यांनी राजकारणात येण्याचं निश्चित केलं. दरम्यानच्या काळात त्यांनी कवी, लेखक म्हणूनही नाव कमावलं होतं.
भारत रत्न
अटल बिहारी वाजपेयी यांना मोदी सरकारने 2015 मध्ये देशाचा सर्वोच्च पुरस्कार भारत रत्नने गौरवलं. प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना घरी जाऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचवेळी त्यांचा अनेक वर्षांनी फोटो समोर आला होता.