नवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचं गुरुवारी 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वाजून 5 मिनिटांनी निधन झालं. ते 93 वर्षांचे होते. त्यांच्या निधनानं भारतीय राजकारणातला भीष्म पितामह हरपला आहे. वाजपेयींच्या निधनाने संपूर्ण देश शोकसागरात बुडाला आहे.

काल संध्याकाळी अटलजींचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी ठेवण्यात आलं. राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील दिग्गज नेत्यांनी त्यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं.

आज सकाळी 9 वाजता त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी नवी दिल्लीतील भाजप मुख्यालयात ठेवण्यात येणार आहे. दुपारी 4 वाजता राष्ट्रीय स्मृतीस्थळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. वाजपेयी यांच्या निधनामुळं देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे.

अटलजींच्या अंत्ययात्रेसाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर फुलांनी सजवलेला रथ सज्ज करण्यात आलाय. दिल्लीतील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अनेक मार्ग बदलण्यात आले आहेत.



अंत्यदर्शन, अंत्ययात्रा आणि अंत्यसंस्काराची वेळ आणि ठिकाण (17 ऑगस्ट) :

▪अंत्यदर्शन - दिल्लीतील कृष्ण मेनन मार्गावरील निवासस्थान (स. 7.30 ते 8.30)

▪अंत्यदर्शन - दीनदयाळ उपाध्याय मार्गावरील भाजप कार्यालय (स. 9 ते दु. 1)

▪अंत्ययात्रा - दु. 1 वा. सुरुवात

▪अंत्यसंस्कार - संध्या. 4 वा. राजघाटावरील राष्ट्रीय स्मृती

पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया

"मी नि:शब्द आहे, शून्यात आहे. पण मनात भावनांचा डोंब उसळला आहे. आम्हा सर्वांचे श्रद्धास्थान असलेले अटलजी आपल्यात राहिले नाहीत. त्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण देशाला अर्पण केला होता. त्यांचं जाणं म्हणजे एका युगाचा अंत आहे.", अशी भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली.

विलक्षण नेतृत्त्व : राष्ट्रपती

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही अटल बिहारी वाजपेयी यांच्या निधनावर आपल्या भावना व्यक्त केल्या. ट्विटरवर त्यांनी लिहिलं आहे की, "माजी पंतप्रधान आणि भारतीय राजकारणातील महान व्यक्ती अटल बिहारी वाजपेयींच्या निधनाने मला अतिशय दु:ख झालं. विलक्षण नेतृत्त्व, दूरदृष्टी आणि अद्भूत भाषण हे त्यांना एक मोठं व्यक्तिमत्त्व बनवतं. त्यांचं विराट आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व आमच्या आठवणीत कायम राहिल."

भारताने महान सुपुत्र गमावला : राहुल गांधी

"भारताने आज आपला महान सुपुत्र गमावला. माजी पंतप्रधान, भारतरत्न वाजपेयी यांना लाखो लोकांचं प्रेम मिळालं होतं. त्यांचं कुटुंब आणि समर्थकांप्रती मी सांत्वन व्यक्त करतो. ते कायम आमच्या स्मरणात राहतील," अशी श्रद्धांजली काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी वाजपेयींना वाहिली.

वाजपेयींचं निधन मनाला वेदना देणारं : मुख्यमंत्री

अटलबिहारी वाजपेयी...केवळ कुण्या एका व्यक्तीचे हे नाव नाही, तर ते नाव आहे एका महासागराचे...नावाप्रमाणेच अटल, अढळ, अचल...ज्यांच्याकडे पाहून राष्ट्रभक्ती या शब्दाचा अर्थ कळतो, ज्यांच्याकडे पाहून राष्ट्राच्या सर्वांगिण विकासाच्या स्वप्नपूर्तीची अभिलाषा जागी होते, आदर्श, सत्यवचनी, कर्तव्य कठोर पण, तितक्याच निर्मळ मनाचा थोर नेता, आधुनिक युगातील एक महापुरुषाचे आज आपल्यातून असे निघून जाणे, मनाला अतिशय अतिशय वेदना देणारे आहे. आमचे थोरनेते, राष्ट्रपुरुष श्रद्धेय अटलजी यांचे आपल्यातून निघून जाणे, ही माझी वैयक्तिक हानी आहे! ज्या नेत्यांकडे पाहून आपण राजकारणाची पायरी चढलो, त्या आदर्शापैकी श्रद्धेय अटलजी एक! लोकशाहीत विविध आयुधं वापरुन समाजाची आणि समाजातील शेवटच्या घटकाची सेवा कशी करता येऊ शकते, याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय आयुष्यातून घालून दिला. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली..., असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

वाजपेयींचं निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची प्राणज्योत गुरुवारी 16 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5 वा. 5 मिनिटांनी मालवली. ते 93 वर्षांचे होते. किडनी संसर्गामुळं वाजपेयी यांना 11 जून रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरु होते. गेल्या 24 तासांपासून त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अखेर गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

93 वर्षीय वाजपेयींना विविध आजारांनी ग्रासलं होतं. त्यांना किडनी संसर्ग तर होताच, शिवाय मूत्रसंसर्ग, छातीदुखी, मधुमेह यासारख्या आजारांनी वाजपेयी त्रस्त होते.

वाजपेयींनी तीन वेळा भारताचं पंतप्रधानपद भूषवलं. जिंदादिल राजकारणी, हळूवार मनाचा कवी, सेवाभावी माणूस, सौम्य हिंदुत्त्ववादी म्हणून अटल बिहारी वाजपेयी परिचीत होते. हिंदुत्ववादी भूमिकेकडे झुकले असूनही वाजपेयींनी नेहमीच धर्मनिरपेक्षतेची बाजू घेतली. त्यामुळेच त्यांना ‘राईट मॅन इन राँग पार्टी’ असं म्हटलं गेलं.

संबंधित बातम्या 

राजकारणातला महाऋषी हरपला, अटल बिहारी वाजपेयींचं निधन 

वाजपेयींचं निधन, ‘कारगिल’ हरलेल्या पाकिस्तानची प्रतिक्रिया  

मी नि:शब्द आणि शून्यात, मोदींची प्रतिक्रिया, वाजपेयींच्या निधनाने देश हळहळला  

मी अविवाहित, पण ब्रम्हचारी नाही, छातीठोकपणे सांगणारे वाजपेयी  

सिनेमा, गाणी, रंग, खेळ, कवी... वाजपेयींच्या आवडी-निवडी काय होत्या?  

हेमा मालिनीचा 'सीता और गीता' वाजपेयींनी 25 वेळा पाहिला!  

आणखी एक भीष्म पितामह गमावला, उद्धव ठाकरेंकडून शोक व्यक्त  

अटल बिहारी वाजपेयींना जडलेला डिमेन्शिया नेमका काय?  

अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी निगडीत 15 रंजक गोष्टी  

जीवनपट प्रदर्शित होण्यापूर्वी अटल बिहारी वाजपेयी कालवश  

अटल बिहारी वाजपेयी यांनी शेवटचं भाषण कधी केलं?  

वाजपेयींमुळे मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचलो: मनोहर जोशी 

हार नहीं मानूँगा, रार नयी ठानूँगा; वाजपेयी-हळव्या मनाचे कवी आणि पत्रकार