नवी दिल्ली : देशाचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. प्रणव मुखर्जी यांना संपूर्ण देशानं आज अखेरचा निरोप दिला. दिल्लीतल्या लोधी रोड स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले. देशाचे माजी राष्ट्रपती या नात्यानं लष्करी मानवंदना देत हा विधी पार पडला.


प्रणव मुखर्जी यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यामुळे त्यांच्यावर कोव्हिड काळातल्या प्रोटोकॉलनुसारच अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र अभिजीत मुखर्जी यांना त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. पार्थिव स्मशानभूमीत आणण्यापासून ते शेवटच्या संस्कारापर्यंत सर्वजण पीपीई किटमध्येच वावरताना दिसत होते. दुपारी दोन वाजता लोधी रोडच्या स्मशानभूमीत हा विधी पार पडला. मोजक्या लोकांच्या उपस्थितीतच हा सोहळा पार पडला. त्याआधी त्यांचे पार्थिव 10 राजाजी मार्ग या त्यांच्या शासकीय निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं.


राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतलं आणि मुखर्जी कुटुंबियांचं सांत्वन केलं. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनीही एका व्हिडिओ संदेशातून माजी राष्ट्रपती मुखर्जी यांना आदरांजली वाहिली. दरम्यान आज झालेल्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीतही सर्व मंत्र्यांनी मुखर्जी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ दोन मिनिटांचं मौन पाळून त्यांना श्रद्धांजली वाहिली. प्रणव मुखर्जी यांना 6 ऑगस्टला दिल्लीत लष्कराच्या रिसर्च अँड रिहर्सल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या मेंदूत गाठ असल्यानं त्याची शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्याचवेळी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचंही निष्पन्न झालं होतं. काल संध्याकाळी त्यांचं उपचारादरम्यानच निधन झालं. ते 84 वर्षांचे होते.