श्रीनगर : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल, जगमोहन मल्होत्रा यांचं निधन झालं आहे. वयाच्या 94 व्या वर्षी दिल्लीमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जम्मू काश्मीरच्या राज्यपालपदी असण्यासोबतच त्यांनी केंद्रीय मंत्रीपदाचीही धुरा सांभाळली होती. जगमोहन मल्होत्राऐवजी फक्त जगमोहन अशीच त्यांची ओळख होती. 


दिल्ली आणि गोव्याच्या राज्यपालपदीही ते विराजमान होते. आपल्या राजकीय कारकिर्दीत ते लोकसभेवरही निवडून गेले होते. दोन सत्रांमध्ये त्यांनी जम्मू काश्मीरच्या राज्यपालपदाची धुरा सांभाळली होती. त्याशिवाय नगरविकास मंत्री आणि पर्यटन मंत्रीपदाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती. कठोर वरिष्ठ अधिकारी अशी दिल्लीत ओळख प्रस्थापित केल्यानंतर त्यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला होता. अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपद भुषवलं होतं. 


अनुच्छेद 370 हटवल्यानंतर खुद्द अमित शाह आणि जेपी नड्डा यांनी चाणक्यपुरी स्थित घरी जाऊन जगमोहन मल्होत्रा यांची भेट घेतली होती असंही म्हटलं जातं. जम्मू काश्मीरमध्ये सर्वप्रथम देशात काँग्रेसची सत्ता असताना 1984 मध्ये राज्यपालपदाची जबाबदारी सोपवली होती. 1989 पर्यंत ते या पदावर विराजमान होते. यानंतर वीपी सिंह सत्तेवर आल्यानंतर जानेवारी 1990 मध्ये त्यांना पुन्हा एकदा जम्मू काश्मीरच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आलं. यावेळी मे 1990 पर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली. 


IN PICS : केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम आणि पुदुच्चेरीच्या मुख्यमंत्रीपदी कोण विराजमान होणार? 


आपल्या राज्यपालपदाच्या कारकिर्दीत त्यांनी काश्मीर खोऱ्या कैक कठोर निर्णय घेतल्याचं म्हटलं जातं. दहशतवाद्यांच्या कारवायांना आळा घालण्यासाठी ते कायम प्रयत्नशील दिसले. तर, काश्मीरी पंडितांवर होणाऱ्या अन्यायाला थांबवण्यासाठीही त्यांनी कायम प्रयत्न केले. स्थानिक नेत्यांकडून त्यांना मोठ्या प्रमाणावर विरोधाचा सामना करावा लागला होता.